एपी, कैरो
संघर्षग्रस्त सुदानमध्ये सैन्य (एसएएएफ) आणि रॅपिड सपोर्ट फोर्स (आरएसएफ) या निमलष्करी दलांमध्ये सुरू असलेल्या शांतता चर्चेला धक्का बसला आहे. आरएसएफ मानवतावादी शस्त्रविरामाचे वारंवार उल्लंघन करत असल्याचा आरोप करत सैन्याने चर्चेतून माघार घेत असल्याचे बुधवारी जाहीर केले. सुदानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सौदी अरेबिया आणि अमेरिका करत असलेल्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. या दोघांच्या मध्यस्थीने एएसएफ आणि आरएसएफ यांनी २१ मे रोजी शस्त्रविरामाच्या करारावर सह्या केल्या होत्या.




सुदानची सत्ता ताब्यात घेण्यासाठी गेल्या महिन्यापासून जनरल अब्देल-फताह बुऱ्हान यांच्या नेतृत्वाखालील एएसएफ आणि जनरल मोहम्मद हमदान दागालो यांच्या नेतृत्वाखालील आरएसएफ यांच्यामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. त्यामध्ये आतापर्यंत किमान ८६६ नागरिकांचा मृत्यू झाला असून हजारो जखमी झाले आहेत. प्रत्यक्षात मृतांचा आकडा यापेक्षा कितीतरी जास्त असल्याची शक्यता वैद्यकीय सेवा क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. त्याशिवाय किमान १४ लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. त्यातील किमान तीन लाख नागरिकांनी शेजारील देशांमध्ये आश्रय घेतला आहे.
सुदान सैन्याचे प्रवक्ते ब्रि. नाबिल अब्दल्ला यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, आरएसएफ मानवतावादी शस्त्रविरामाचे वारंवार उल्लंघन करत आहे, त्याबरोबरच त्यांनी राजधानी खार्तुममध्ये रुग्णालयांचा आणि इतर नागरी आस्थापनांचा ताबा घेतला आहे. त्याचा निषेध म्हणून सैन्य चर्चेतील सहभाग स्थगित करत आहेह्ण. पुढे काय पावले उचलायची यावर चर्चा करण्यापूर्वी अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या मध्यस्थीने मान्य करण्यात आलेल्या शस्त्रविरामाच्या अटींचे संपूर्ण पालन झाले पाहिजे याची सैन्याला हमी हवी आहे असे त्यांनी सांगितले.
शस्त्रविरामाच्या अटींनुसार, निवासी मालमत्ता आणि मानवतावादी मदतीची लूट थांबवण्याचे, तसेच रुग्णालये आणि विद्युतनिर्मिती केंद्रांसारख्या ठिकाणी आसरा न घेण्याचे दोन्ही गटांनी मान्य केले होते.
आतापर्यंत सात वेळा शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र प्रत्येक वेळी त्याचे उल्लंघन झालेले आहे आणि त्यासाठी दोन्ही गटांनी एकमेकांना जबाबदार ठरवले आहे.