पीटीआय, नवी दिल्ली
भाजपने मध्य प्रदेशची सत्ता राखल्याचा आणि काँग्रेसच्या हातून राजस्थान व छत्तीसगड ही महत्त्वाची राज्ये गेल्याचा परिणाम विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीवर होण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ६ डिसेंबर रोजी आघाडीची बैठक बोलाविली आहे. तत्पूर्वी रविवारच्या निकालांनंतर आलेल्या प्रतिक्रियांवरून येत्या काळात मित्रपक्षांकडून काँग्रेस कोंडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चार मोठय़ा राज्यांतील निकालांनंतर आता सर्व राजकीय पक्षांना २०२४च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्याची रणनीती ठरविण्यासाठी विरोधी आघाडी ‘इंडिया’ची ६ तारखेला दिल्लीत बैठक होणार आहे. खरगे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीत भाजपच्या आव्हानाला एकजुटीने सामोरे जाण्याबाबत रणनीतीला अंतिम स्वरूप दिले जाण्याची शक्यता आहे. पाच राज्यांमधील निकालांचे मूल्यमापन या बैठकीत केले जाईल. तसेच आघाडीच्या संयुक्त सभांचे वेळापत्रकही ठरविले जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांमधील जागावाटपाची चर्चा या बैठकीत पुढे जाण्याचा अंदाज असताना त्यावर ताज्या निकालांचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि संयुक्त जनता दलाच्या के. सी. त्यागी यांनी या निकालांचा ‘इंडिया’ आघाडीवर परिणाम होणार नसल्याची प्रतिक्रिया दिली असली तरी अन्य काही पक्षांनी काँग्रेसची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसते. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी काँग्रेस मित्रपक्षांकडे दुर्लक्ष करत असून स्वपक्षावर निवडणूक जिंकण्यास असमर्थ असल्याची टीका केली. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी हा भाजपच्या विजयापेक्षा काँग्रेसचा पराभव अधिक असल्याचा टोमणा लगावला. राज्यांचे निकाल लागेपर्यंत आघाडीची बैठक न बोलाविण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेवर एका मित्रपक्षाच्या नेत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘‘काँग्रेसला निकालांपूर्वी बैठक नको होती. जागावाटपाच्या वाटाघाटींमध्ये वरचढ ठरण्यासाठी ते या निकालांची प्रतीक्षा करीत होते,’’ असे या नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर म्हटले आहे. काँग्रेसने ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांसाठी काही जागा सोडल्या असत्या तर मध्य प्रदेशचा निकाल वेगळा लागला असता, असे भाकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही काँग्रेसला टोला लगावला आहे.
हेही वाचा >>>Rajasthan Election : अंतिम निकाल जाहीर, भाजपाला स्पष्ट बहुमत, काँग्रेससह इतर पक्षांची स्थिती काय?
चार राज्यांतील निवडणूक निकालांचा ‘इंडिया’ आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक घेणार आहोत. तळागाळातील वास्तवाची माहिती असलेल्या व्यक्तींबरोबर चर्चा करणार आहोत. त्यानंतरच याबाबत प्रतिक्रिया देता येईल. – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी
मध्य प्रदेशात काँग्रेसने ‘इंडिया’तील पक्षांसाठी काही जागा सोडल्या असत्या तर निकाल वेगळा लागला असता. मित्रपक्षांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काँग्रेसने बदलला पाहिजे. अर्थात, या निकालांमुळे ‘इंडिया’तील घटक पक्षांच्या एकीला तडा जाईल असे वाटत नाही. – संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट
विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहिल्यानंतर भविष्यातही अशीच परिस्थिती राहिल्यास ‘इंडिया’ ही विरोधी आघाडी जिंकू शकणार नाही. अशा निकालाची अपेक्षा नव्हती. त्यामुळे भाजपचे अभिनंदन केले पाहिजे. – ओमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू- काश्मीर
अखिलेशजी (यादव) यांच्याबाबत कमलनाथ यांनी उच्चारलेले अवमानकारक शब्द हे काँग्रेसच्या पराभवाचे कारण आहे. समाजवादी पक्षाला काही जागा दिल्या असत्या व कमलनाथ यांनी टीका केली नसती तर काँग्रेसची कामगिरी इतकी खराब झाली नसती. – मनोज यादव, प्रवक्ता, समाजवादी पक्ष