भारतीय वायुदलातील सर्वात अत्याधुनिक मध्यम वजनाची लढाऊ विमाने म्हणून राफेल लढाऊ विमान ओळखलं जातं. फ्रान्स देशाचे तंत्रज्ञान असलेल्या राफेल लढाऊ विमानांचा ताफा येत्या एप्रिल महिन्यात पुर्णत्वास जाणार आहे. आत्तापर्यंत ३० राफेल विमाने भारतीय वायूदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीन राफेल विमाने दाखल होणार असून एप्रिल महिन्यात उर्वरीत तीन विमाने दाखल होणार आहे. यापैकी शेवटची तीन राफेल विमाने ही आणखी अत्याधुनिक असणार आहे, भारतीय वायूदलाच्या मागणीनुसार दाखल होणाऱ्या शेवटच्या तीन राफेलमध्ये आवश्यक बदल केले जात आहेत.

‘राफेल’ मध्ये बदल का आवश्यक आहेत ?

२०१० नंतर विविध चाचण्या घेतल्यावर विविध लढाऊ विमानांमधून राफेल विमानांची निवड करण्यात आली आणि २०१६ मध्ये राफेल करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रत्यक्षात जुलै २०२० पहिले राफेल भारतीय वायूदलात दाखल झाले. हे राफेल जरी अत्याधुनिक असले तरी बदलत्या काळानुसार, परिस्थितीनुसार, तंत्रज्ञानानुसार काही बदल करावे लागतात. आता गेली दोन वर्ष भारतीय वायूदल राफेलचा पुरेपुर वापर करत असून यामध्ये काही बदल सुचवले आहेत जे शेवटच्या तीन राफेलमध्ये केले जातील. तशी तरतूद करार करतांना करण्यात आली आहे.

राफेलमध्ये काय बदल केले जाणार आहेत ?

हवेतून हवेत अधिक अंतरावर मारा करणारे क्षेपणास्त्र सामावून घेण्याची सोय, फ्रिक्वेन्सी जॅम करणारे रडार, अत्याधुनिक संपर्क यंत्रणा, जमिनीवरील रडारची सूचना देणारे रिसिव्हर, जमिनीवरील हालचालीची वेगाने नोंद करणारे संवेदक, विमानाच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राची जलद नोंद करणारी यंत्रणा असे काही बदल हे भारतीय वायूदलाने सुचवले आहेत. हे बदल शेवटच्या तीन राफेल लढाऊ विमानात केले जातील. जेव्हा टप्प्याटप्प्याने उर्वरीत राफेलचे नुतनीकरण करण्यात येईल तेव्हा हे आवश्यक बदल इतर ३३ राफेलमध्ये केले जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान भारताच्या राफेलशी स्पर्धा करण्यासाठी पाकिस्तान चीनकडून J-10C ही लढाऊ विमाने खरेदी करत आहे. २०२३ च्या मध्यापर्यंत चीनचे तंत्रज्ञान असलेली २५ लढाऊ विमाने पाकिस्तान वायुदलाच्या ताफ्यात दाखल होतील.