लसीकरणाचे वाढलेले प्रमाण, वाढलेली सामूहिक प्रतिकारशक्ती यामुळे देशात करोना रुग्णांच्या नोंदीचा आलेख हा घसरत आहे. गेल्या २४ तासात देशात १३,९०१ करोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर १३ हजार ८७८ लोकं ही करोना मुक्त झाली. यामुळे सक्रिय करोना बांधितांचा आकडा हा एक लाख ३८ हजार ५५६ एवढा खाली आला आहे. गेल्या २६६ दिवसातील सर्वात कमी सक्रिय रुग्ण हे देशामध्ये आहेत. आत्तापर्यंत ३ कोटी ४४ लाखांपेक्षा जास्त लोकांना करोना झाल्याचं केंद्राच्या आरोग्य विभागाने जाहिर केलेल्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.

गेल्या २४ तासात ३४० जणांची करोनामुळे मृत्यु झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे करोनामुळे मृत्यु झालेल्यांची एकुण संख्या देशात आता ४ लाख ६२ हजार १८९ एवढी झाली आहे. गेले अनेक दिवस दररोज करोनो बाधितांचा आकडा सातत्याने २० हजारच्या पुढे होता. मात्र गेले ३४ दिवस देशात दैनंदिन करोना बाधितांची नोंद ही २० हजारच्या खाली झाली राहिली आहे, तर गेले १३७ दिवस करोना बाधितांची नोंद ही ५० हजाराच्या खाली राहीलेली आहे.