मानव जागतिक जैवविविधता आणि परिसंस्थेचा ऱ्हास करत आहे. या परिणामांमुळे शेकडो वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत आणि आज अंदाजे १० लाख प्रजाती नामशेष होण्याचा धोका आहे. परंतु, एका नवीन अभ्यासाच्या लेखकांनी सध्याच्या जैवविविधतेच्या संकटाला तोंड देण्यासाठी तातडीने उपाययोजना आखण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, अद्याप पृथ्वीवरील सहावे मास एक्स्टिंक्शन (सजीव सृष्टी सामूहिकपणे नष्ट होण्याची प्रक्रिया) सुरू झालेले नाही.

“अलिकडच्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, प्राण्यांच्या प्रजातींचे नष्ट होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे आणि यामुळे मानवी अस्तित्व धोक्यात आले आहे”, असे अमेरिकेतील अ‍ॅरिझोना विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र आणि उत्क्रांती जीवशास्त्राचे प्राध्यापक जॉन वियन्स यांनी म्हटले आहे.

पृथ्वीच्या इतिहासात, ५ वेळा मास एक्स्टिंक्शन झाले आहे. यामध्ये कमीत कमी ७५ टक्के प्रजाती अल्प भूगर्भीय कालावधीत नष्ट झाल्या आहेत. असे असले तरी पृथ्वीवरील जीवन टिकून राहिले आहे.

सुमारे ४४३ दशलक्ष वर्षांपूर्वी ऑर्डोविशियन काळाच्या शेवटी पहिल्या मास एक्स्टिंक्शमुळे पृथ्वीवरील सर्व प्रजातींपैकी ८६ टक्के प्रजाती नष्ट झाल्या. त्यानंतर ३७५ दशलक्ष वर्षांपूर्वी ७५ टक्के प्रजाती नाहीशा झाल्या.

दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी PLOS बायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या नामशेष होण्याच्या नवीन विश्लेषणामध्ये सहावे मास एक्स्टिंक्शन सुरू झाले नसल्याचे म्हटले आहे. संशोधकांचा असा अंदाज आहे की, अलिकडच्या शतकांमध्ये मानव-प्रेरित प्रजातींचे नष्ट होणे दुर्मिळ झाले आहे.