धानोरा तालुक्यातील सिंदेसूरच्या चकमकीत केवळ कर्णबधिर असल्यामुळे सुखदेवला  वाचवण्यासाठी गेलेल्या मुकेशला प्राण गमवावे लागले, अशी माहिती आता पोलीस जवान व प्रत्यक्षदर्शीच्या जबाबातून समोर आली आहे. लपून बसलेले हे दोन तरुण उभे राहिले नसते तर नक्षलवाद्यांच्या बळींची संख्या वाढली असती, असे या चकमकीत सहभागी झालेल्या जवानांनी सांगितले.
 १२ एप्रिलला झालेल्या चकमकीत या दोन तरुणांसह चार नक्षलवादी ठार झाले, तर एक जवान शहीद झाला. प्रस्तुत प्रतिनिधीने घटनास्थळाचा दौरा केल्यानंतर आणि प्रत्यक्षदर्शी गावकरी, जवान व अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर चकमकीच्या वेळी नेमके काय घडले याची सविस्तर माहिती समोर आली आहे. या दोन तरुणांनी गावातून पाणी आणून दिल्यानंतर नक्षलवाद्यांनी जेवण सुरू केले. नेमके त्याच वेळेस पोलिसांनी घेरले आहे हे पहारा देणाऱ्या नक्षलवाद्याच्या लक्षात आले. त्याने पहिली गोळी झाडताच एक जवान शहीद झाला. यानंतर सी-६०च्या जवानांनी गोळीबार सुरू करताच नक्षलवाद्यांसोबत बसलेले गावकरी ओरडायला लागले. सी-६०चा कमांडर नागेशने या गावकऱ्यांना ‘‘ओरडू नका नाल्याच्या घळीत दडून बसा, अजिबात हालचाल करू नका’’, असे मोठय़ा आवाजात सांगितले.
नागेशचे म्हणणे ऐकत गावकरी घळीत दडून बसले. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी या गावकऱ्यांना समोर करून पळण्याचा प्रयत्न सुरू केला. दोन्ही बाजूंनी गोळय़ांचे आवाज व गलका एकदम वाढला. यातले काहीही ऐकू न येणारा सुखदेव अचानक उठून उभा झाला. आता हा मरणार हे लक्षात येताच त्याच्या शेजारी असलेला मुकेश त्याला खाली बसवण्यासाठी व वाचवण्यासाठी उभा झाला. मुकेशने हातवारे करून परिस्थिती बिकट आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्णबधिर सुखदेवला काहीच समजले नाही. हे दोघे उभे असतानाच त्यांना गोळय़ा लागल्या व त्यात दोघेही ठार झाले, अशी माहिती आता समोर आली आहे. घळीत बसलेले गावकरी चकमक संपेपर्यंत उभेच झाले नाहीत म्हणून वाचले. हे दोन तरुण मृत्युमुखी पडल्याचे लक्षात येताच सी-६०च्या जवानांनीसुद्धा सावधपणे प्रत्युत्तर देणे सुरू केले. त्याचा फायदा नक्षलवाद्यांना मिळाला व ते पसार होण्यात यशस्वी झाले, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. चकमकीच्या ठिकाणी नक्षलवाद्यांना तसेच गावकऱ्यांना दडून बसण्यासाठी नाल्याची घळ वगळता दुसरी जागा नव्हती. हा नाला फारसा खोल नसल्याने व आजूबाजूला विरळ जंगल असल्याने नक्षलवादी चांगलेच कोंडीत सापडले होते. मात्र चकमकीच्या प्रारंभीच दोन तरुण मारले गेल्याचे लक्षात आल्यानंतर आम्हाला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला, असे यात सहभागी झालेल्या एका जवानाने सांगितले. गावकरी नसते तर तेथे हजर असलेला कमांडर दिनकर यांच्यासह एकही नक्षलवादी वाचला नसता, असे या जवानाने सांगितले.
संपर्क सेवेसाठी वापर
ज्या ठिकाणी चकमक झाली तिथे मोबाइलचे पूर्ण कव्हरेज मिळते. घनदाट जंगलात अशी जागा मिळणे पर्वणीच असते. त्यामुळे नक्षलवादी नेहमी या ठिकाणी थांबायचे व इंटरनेट व मोबाइलचा वापर करायचे. संपर्क सेवेसाठीच त्यांनी ही जागा निवडली होती. चकमकीच्या आधीसुद्धा नक्षलवादी मोबाइलवर बोलत होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीकडून मिळाली. विकासाला विरोध करणारे नक्षलवादी संपर्कासाठी सर्व आधुनिक साधने वापरतात, हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.