करोना विषाणूविरोधात जीवाचा धोका पत्करुन लढणारे डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) टाळ्या आणि थाळ्या वाजवून आभार मानण्याचे आवाहन जनतेला केलं होतं. या आवाहनला जनतेनं चांगला प्रतिसाद दिला आहे. रविवारी संध्याकाळी बरोबर ५ वाजता लोकांनी आपापल्या सोसायट्यांच्या परिसरात, गॅलरीमध्ये येऊन टाळ्या वाजवल्या तसेच बच्चे कंपनीनं थाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

राज्यातील जनतेनेही पंतप्रधानांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद दिला आहे. मुंबई, पुणे, नाशिक इथून नागरिकांनी आपापल्या सोसायट्यांमध्ये टाळ्या वाजवून, थाळ्या वाजवून तसेच पुण्यात काही ठिकाणी लोकांनी फटाके फोडून करोना योद्ध्यांचे आभार मानले आहेत.

मुंबईत महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील आपल्या कुटुंबियांसोबत बंगल्याच्या गच्चीवर जाऊन टाळ्या आणि घंट्या वाजवून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देखील थाळी वाजवून यामध्ये सहभाग नोंदवला.