पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा त्यांनी शपथ घेतली हा सोहळा काही वेळापूर्वीच पार पडला. त्यामध्ये २४ जणांना कॅबिनेट मंत्री म्हणूनही शपथ देण्यात आली. यामध्ये कमतरता जाणवली ती मागील मंत्रिमंडळातल्या तीन चेहऱ्यांची. अरूण जेटली, सुषमा स्वराज आणि उमा भारती या तिघांचा समावेश नव्या मंत्रिमंडळात करण्यात आलेला नाही. अरूण जेटली हे मागच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी शपथविधी सोहळ्याच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोणतीही जबाबदारी देऊ नका अशी विनंती केली होती. ही विनंती मान्य करत त्यांना कोणतेही केंद्रीय मंत्रीपद देण्यात आले नाही.

माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याप्रमाणेच माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी प्रकृतीचे कारण देत निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांचीही कोणत्याच मंत्रिपदी वर्णी लागलेली नाही. मागील सरकारच्या काळात म्हणजेच २०१४ ते २०१९ या काळात सुषमा स्वराज यांनी एक सक्षम परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले. त्या ट्विटरवरही अॅक्टिव्ह होत्या. त्यांच्या समोर आलेली समस्या त्या अत्यंत खुबीने आणि कुशलतेने सोडवत. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रकृतीने साथ दिली नाही. त्याचमुळे त्या मंत्रिमंडळात नाहीत. उमा भारती यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. गंगा स्वच्छता अभियानाचा स्वतंत्र कार्यभार त्यांना देण्यात आला होता. मात्र यावेळी त्यांना मंत्री म्हणून शपथ देण्यात आलेली नाही.

मागच्या वेळी म्हणजेच २०१४ मध्ये जेव्हा मोदी सरकारचा शपथविधी सोहळा झाला त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद देण्यात आले होते. मात्र गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. तसेच मनोहर पर्रिकर यांनाही केंद्रीय मंत्रीपद देण्यात आले होते, त्यानंतर त्यांना गोव्यात मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आले. मात्र कर्करोगामुळे त्यांचेही निधन झाले. आता नव्या मंत्रिमंडळात मागच्या मंत्रिमंडळातले अरूण जेटली, सुषमा स्वराज आणि उमा भारती हे चेहरे दिसणार नाहीत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा समावेश मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात करण्यात आला आहे. त्यांना कोणतं खातं दिलं जाणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच अमित शाह केंद्रीय मंत्री झाल्याने त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपद सोडावं लागणार आहे. त्यामुळे या पदावर कुणाची वर्णी लागणार हे पहाणेही महत्त्वाचे ठरणार आहे.