देशभरात करोना महामारीची तिसरी लाट आलेली आहे. दैनंदिन रूग्ण संख्येत मोठी वाढ सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशी देशात दररोज आढळणाऱ्या नवीन करोनाबाधितांची संख्या ही अडीच लाखांच्या वर दिसून आली आहे. शिवाय, करोनाबाधितांचे मृत्यू देखील होत आहेत. एककीकडे करोनाने पुन्हा डोकं वर काढलेलं असताना, दुसरीकडे करोनाचाच नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचा संसर्ग देखील वाढत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याच पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्लीमधील गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मंगळवार ११ जानेवारीला दुपारी १२ वाजता एका ऑनलाइन प्रेस कॉन्फरन्स दरम्यान केजरीवाल यांनी दिल्ली सरकारचा नवीन उपक्रम ‘दिल्ली की योगशाला’ बद्दल नागरिकांना माहिती दिली. या योगशाळा कार्यक्रमाद्वारे दिल्लीतील गृहविलगीकरणात असलेले करोना रुग्ण/संशयित व्यक्ती योग शिकून त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत करू शकतील, असे केजरीवाल यांनी सांगितले.

ओमायक्रॉन संक्रमणापासून बचाव करायचा आहे? तर ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश कराच

केजरीवाल यांच्या मते, शहरातील गृहविलगीकरणात असलेले करोना रुग्ण या उपक्रमाअंतर्गत घरबसल्या योगा करू शकतील. यासाठी सरकारकडून प्रशिक्षकांची एक मोठी टीम तयार करण्यात आली आहे. हे प्रशिक्षक रुग्णांना योगासने दाखवतील आणि शिकवतील. केजरीवाल यांनी सांगितले, “रुग्णांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक लिंक पाठवली जाईल. दिवसात पाच वर्ग भरतील. हे वर्ग सकाळी सहा वाजल्यापासून ११ वाजेपर्यंत चालतील. तसेच संध्याकाळी ३ वर्ग असतील. हे वर्ग संध्याकाळी ४ वाजल्यापासून ७ वाजेपर्यंत चालतील. प्रत्येक वर्ग एक तासाचा असेल.”

रुग्ण आपल्या आवडीनुसार वर्गाची वेळ निवडू शकतात. एकावेळी जवळपास ४० हजार लोक या वर्गात उपस्थित राहू शकतात, पण या वर्गांमध्ये १५च रुग्ण असतील जेणे करून प्रशिक्षक प्रत्येक रुग्णाला पुरेसा वेळ देऊ शकतात. १२ तारखेपासून हे वर्ग सुरु झाले आहेत.

दरम्यान, देशातील अ‍ॅक्टिव्ह केसेसची संख्या १४,१७,८२० आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट १६.६६ टक्के असल्याचे समोर आले आहे. याशिवाय, ६ हजार ४१ ओमायक्रॉन बाधितांचीही नोंद झालेली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This government organised yogashala program for patients with home isolation pvp
First published on: 15-01-2022 at 19:32 IST