इम्फाळ : मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम जिल्ह्यामध्ये शुक्रवारी पुन्हा वांशिक हिंसाचार झाला. हल्लेखोरांच्या हल्ल्यामध्ये तिघे ठार झाले तर दोन जण जखमी झाले. हे हल्लेखोर सुरक्षा दलाच्या सैनिकांच्या वेशात आले होते. त्यांनी झडती घेण्याच्या बहाण्याने लोकांना घराबाहेर बोलावले आणि त्यांच्यावर गोळीबार केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

इम्फाळ पश्चिम जिल्हा आणि कांगपोकी यांच्या सीमेवरील खोकेन गावामध्ये ही घटना घडली. हल्लेखोरे मैतेई समुदायाचे असावेत असा संशय असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या गावामध्ये गस्त घालत असलेल्या सुरक्षा सैनिकांनी बंदुकांचे आवाज ऐकल्यानंतर तिकडे धाव घेतली. पण हल्लेखोर पळून गेले. आसाम रायफल्सच्या जवानांनी मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर मणिपूर पोलीस, आसाम रायफल्स आणि सैन्याने संयुक्तपणे परिसरात शोध मोहीम राबवली.

इंटरनेट बंदीबाबत तातडीने सुनावणीस न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये सातत्याने इंटरनेट सेवा खंडित करण्याविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मणिपूरच्या दोन रहिवाशांनी ही याचिका दाखल केली होती. या मुद्दय़ावरील उच्च न्यायालयात आधीच सुनावणी घेतली जात असल्याचे उन्हाळी सुट्टीतील न्या. अनिरुद्ध बोस आणि न्या. राजेश िबदल यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सांगितले.

मणिपूर सरकारने इंटरनेटवरील बंदी १० जूनपर्यंत वाढवण्याची घोषणा मंगळवारी केली होती. त्याविरोधात चोंगथम व्हिक्टर सिंह आणि मायेन्गबम जेम्स यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका  केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तपासासाठी सीबीआयचे विशेष पथक

नवी दिल्ली : मणिपूर सरकारने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविलेल्या हिंसाचाराच्या सहा प्रकरणांच्या तपासासाठी सीबीआयने उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. मणिपूरमधील हिंसाचाराच्या सहा घटनांचा सीबीआयमार्फत तपास केला जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या मणिपूर दौऱ्यात जाहीर केले होते. यापैकी पाच प्रकरणे ही हिंसाचारासाठी गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचण्याबाबत आहेत.