चितौडगढ (राजस्थान): प्रखर देशभक्त, विज्ञानवादी समाजसुधारक, बुद्धिमान महाकवी, इतिहासकार, तत्त्वज्ञ आदी असंख्य पैलूंनी परिपूर्ण असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या महामानवावर राजकीय स्वार्थातून चिखलफेक करणारे राहुल गांधी यांना आपल्या कुटुंबातील तीन पिढय़ांपलीकडचा स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास माहीत नाही. सावरकरांचा द्वेष करून हीन राजकारण करणाऱ्या राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी आदी काँग्रेस नेत्यांच्या सावरकरांविषयीच्या मतांचा अभ्यास करावा, असा सल्ला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज येथे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलताना दिला.

भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राष्ट्रभक्तीची अनेक उदाहरणे देत तावडे यांनी सावरकर यांच्या साहित्यिक पैलूंची अभ्यासपूर्ण उकल केली. दुर्दैवाने आज क्षुद्र राजकारणापोटी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा विपर्यास करण्याची मोहीम राहुल गांधी आणि काँग्रेच्या नेत्यांनी सुरू केल्याने सावरकरांच्या शतपैलू व्यक्तिमत्त्वाचे देशाला नव्याने दर्शन घडविण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. इंदिरा गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर पहिले टपाल तिकीट प्रसिद्ध केले, डॉ. मनमोहन सिंग यांनी सावरकरांचे स्वातंत्र्यलढय़ातील श्रेष्ठ योगदान मान्य केले. पण सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी हा इतिहास जाणून घ्यावा, असे तावडे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रखर देशभक्त आणि सशस्त्र क्रांतिकारक तर होतेच, पण ते महान साहित्यिकही होते. काव्य, नाटक, साहित्य, चिंतनपर लेखन, अशा साहित्याच्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या उत्तुंग प्रतिभेचा आविष्कार घडविला, असे सांगून, सावरकरांच्या काव्यप्रतिभेचे उत्कट रसग्रहण करीत तावडे यांनी सावरकरांच्या अजरामर कवितांचा पट उपस्थितांसमोर उलगडला. गोमांतक, सप्तर्षी, रानफुले, कमला, अग्निजा, अग्निनृत्य, कुसुमसंचय अशा प्रतिभासंपन्न काव्यातूनही सावरकरांचे समाजभान आणि प्रखर राष्ट्रनिष्ठेचे प्रतिबिंब उमटते, असे ते म्हणाले.या महामानवावर आज राजकीय स्वार्थासाठी टीका व्हावी हे देशाचे दुर्दैव आहे, अशी खंतदेखील तावडे यांनी व्यक्त केली.