scorecardresearch

“लोकशाहीच्या हत्येचा कुत्सित प्रयत्न” लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीच्या छापेमारीनंतर काँग्रेस आक्रमक

तेजस्वी यादव यांच्या घरी छापेमारी झाल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे

Trying To Kill Democracy Congress Slams Centre After Raids On Tejashwi Yadav
जाणून घ्या काय म्हटलं आहे खरगे यांनी? मल्लिकार्जुन खरगे, नरेंद्र मोदी (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नरेंद्र मोदी सरकार हे विरोधी पक्षांच्या विरोधात तपास यंत्रणांचा दुरुपयोग करतं आहे. लोकशाहीच्या हत्येचा हा कुत्सित प्रयत्न आहे असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या घरावर, कार्यालयांवर त्यांच्याशी संबंधित लोकांवर ईडीने छापेमारी केली आहे. त्यानंतर हे वक्तव्य मल्लिकार्जुन खरगेंनी केलं आहे.

काय म्हटलं आहे खरगे यांनी?

राजदचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित सुमारे १५ ठिकाणी ईडीने छापेमारी केली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. त्यानंतर आता मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. तुमचे खास दोस्त असलेल्यांची संपत्ती जेव्हा गगनाला गवसणी घालते तेव्हा त्यांची चौकशी तपास यंत्रणा का करत नाहीत? असाही टोला मल्लिकार्जुन खरगे यांनी लगावला आहे. गौतम अदाणी प्रकरणावरून त्यांनी मोदींवर ही टीका केली आहे. एवढंच नाही तर देशातले अनेक व्यापारी बँका बुडवून पळाले तेव्हा मोदी सरकारच्या या तपासयंत्रणा काय करत होत्या? असाही प्रश्न खरगे यांनी विचारला आहे.

मल्लिकार्जुन खरगेंनी आपल्या ट्विटमध्ये आणखी काय म्हटलं आहे?

मोदीजी मागच्या १४ तासांपासून बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. त्यांची गरोदर पत्नी आणि त्यांची बहिण यांना विनाकारण त्रास दिला जातो आहे. लालू प्रसाद यादव यांचं वय झालं आहे ते आजारी आहेत तरीही मोदी सरकारच्या त्यांच्या प्रति माणुसकी दाखवायला तयार नाही या आशयाचं ट्विटही खरगे यांनी केलं आहे.

रोहिणी आचार्य यांचं ट्विट काय?

लालूप्रसाद यादव यांची चौकशी सुरू झाल्यानंतर त्यांची मुलगी रोहिणी आचार्य हिने ट्विटच्या माध्यमातून केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. “माझ्या ७४ वर्षीय बाबांना नाहक त्रास दिला जात आहे. जर त्यांना काही झालं तर मी कुणालाही सोडणार नाही. माझ्या बाबांना अशा प्रकारे त्रास देणं हे योग्य नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या जातील. वेळ खूप बलवान असते, यात खूप ताकद असते. हे कुणीही विसरू नये”, या आशयाचं ट्विट रोहिणी आचार्य यांनी केलं आहे.

जमिनीच्या बदल्यात नोकरी हा घोटाळा काय आहे?

मे २०२२ मध्ये, सीबीआयने लालूप्रसाद, राबडी देवी आणि त्यांची मुलगी मिसा भारती आणि हेमा यादव यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा खटला दाखला केला. लालूप्रसाद केंद्रीय रेल्वेमंत्री असताना त्यांनी रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याच्या बदल्यात भूखंड स्वीकारले, असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. सीबीआयच्या माहितीनुसार, लालूप्रसाद रेल्वेमंत्री असताना पाटण्यातील १२ लोकांना रेल्वेच्या गट ‘ड’ पदांवर नियुक्ती देण्यात आली होती. या नियुक्त्यांच्या बदल्यात लालूप्रसाद कुटुंबीयांना पाटणा आणि आसपासच्या परिसरातील सात भूखंड अतिशय कमी दरात मिळाले. हे भूखंड ज्या १२ लोकांना रेल्वेत नोकरी मिळाली त्यांच्या कुटुंबाचे होते, अशी माहिती सीबीआयने दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2023 at 08:26 IST