उत्तर प्रदेशमध्ये आदित्यनाथ यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांना प्रशासनात सहाय्य करण्यासाठी केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांची निवड उप-मुख्यमंत्री म्हणून करण्यात आली आहे. राज्याला प्रथमच दोन उप-मुख्यमंत्री मिळाले आहेत. एखाद्या कॉर्पोरेट प्रणाली प्रमाणे दोन किंवा तीन व्हाइस प्रेसिडंड असतात त्याप्रमाणेच दोन उप-मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली आहे. दोघांची निवड करण्यामागे भारतीय जनता पक्षाने एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याचे म्हटले जात आहे.
केशव प्रसाद मौर्य हे विश्व हिंदू परिषदेमधून भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झालेले नेते आहेत. त्यांच्या पाठीमागे ओबीसी आणि दलित वर्गाचा जनाधार आहे. तर दिनेश शर्मा हे उच्च-वर्णीय समाजातील आहेत. उत्तर प्रदेशाच्या राजकारणात हे संतुलन राहणे आवश्यक असल्याची जाणीव झाल्यामुळे दोन उप-मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली आहे. निवडणुकीमध्ये पक्षाला जे यश मिळाले ते मिळवण्यात मौर्य यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते तर दिनेश शर्मा यांची प्रतिमा ही अतिशय उजळ आहे. केशव प्रसाद मौर्य हे मागास वर्गातील नेते आहे. विश्व हिंदू परिषद आणि आरएसएसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला प्रारंभ केला.
तर, २०१२ मध्ये ते भारतीय जनता पक्षामध्ये सक्रियरित्या काम करू लागले. उप-मुख्यमंत्री म्हणून दुसरे नाव आहे ते डॉक्टर दिनेश शर्मा यांचे. नरेंद्र मोदी यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांमध्ये त्यांची उठबस असते. तसेच ते अमित शहा यांचे खास आहेत. पंतप्रधान मोदींच्या मर्जीतील नेते असल्याचा फायदा त्यांना पक्षात वेळोवेळी झाला आहे. ते मधील काही काळ गुजरातचे प्रभारी होते. दिनेश शर्मा हे कॉमर्सचे प्राध्यापक होते. लखनौ विद्यापीठात ते वाणिज्य शाखेचे प्राध्यापक आहेत. अभ्यासू आणि प्रामाणिक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ते दोन वेळा महापौर बनले आहेत. २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यावर त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले तर गुजरातचे प्रभारी पदही त्यांना देण्यात आले.