जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्य़ात शनिवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले. जिल्ह्य़ाच्या मेंढर उपविभागातील एका जंगल भागात ही चकमक अद्यापही सुरू आहे.
मेंढर उपविभागातील नार खास जंगल भागात दहशतवाद प्रतिबंधक महीम सुरू असताना गुरुवारी सायंकाळी सैन्यदल आणि दहशतवादी यांनी एकमेकांवर गोळीबार केला. या गोळीबारात लष्कराचे २ जवान गंभीर जखमी झाले व नंतर रुग्णालयात मरण पावले, असे संरक्षण विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले.
रायफलमन विक्रम सिंह नेगी (२६) व योगांबर सिंह (२७) हे चकमकीत शहीद झाले. त्यांनी अतुलनीय धैर्य दाखवत कर्तव्यासाठी सर्वोच्च त्याग केला. या त्यागासाठी देश त्यांचा ऋणी राहील, असे हा अधिकारी म्हणाला.
रायफलमन नेगी हा उत्तराखंडच्या टिहरी गढवाल जिल्ह्य़ातील विमान खेडय़ाचा रहिवासी होता, तर रायफलमन सिंह हा याच राज्यातील चमोली जिल्ह्य़ातील संकरी खेडय़ाचा रहिवासी होता.
पूंछ जिल्ह्य़ाच्या सूरनकोटमधील डेरा की गली येथे मंगळवारी झालेल्या चकमकीत एका जेसीओसह लष्कराचे ५ जवान शहीद झाले होते. या घटनेत सहभागी असलेले दहशतवादी गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या भागात असल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले होते.
पुलवामात दहशतवादी ठार
दरम्यान, श्रीनगरमध्ये अलीकडेच नागरिकांची हत्या घडवून आणणारा शाहिद बशीर शेख हा दहशतवादी शुक्रवारी जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्य़ात सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत ठार झाला. २ ऑक्टोबरला ऊर्जा विकास विभागाचा कर्मचारी मोहम्मद शफी दार याची हत्या करण्यात त्याचा सहभाग होता, असे पोलिसांनी सांगितले. पुलवामाच्या वाहीबाग भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तेथे वेढा घालून शोधमोहीम सुरू केली होती.
यावेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. शाहिद बशीर शेख नावाचा हा दहशतवादी श्रीनगरचा राहणारा होता.