घर विकत घ्यायचं आहे, मुलांना डॉक्टर झालेलं पाहायचं आहे हे वक्तव्य आहे रेश्मा बानो यांचं. दोन वर्षांपूर्वी त्यांनी हे स्वप्न पाहिलं होतं. रेश्मा बानो यांचे पती डॉ. यसीन खान हे वरिष्ठ निवासी डॉक्टर होते. दिल्लीतल्या ESIC रुग्णालयात ते कार्यरत होते. मात्र एका RPT वाहनाची धडक त्यांच्या स्कूटरला लागली आणि त्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून रेश्मा बानो आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

८ सप्टेंबर २०२५ ला कुटुंबाला मोठा दिलासा

मात्र अखेर या घटनेला दोन वर्षे झाल्यानंतर सोमवारी म्हणजेच ८ सप्टेंबर २०२५ ला या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. विशेष सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश शेली अरोरा यांनी मोटर अपघात क्लेम्स ट्रि्ब्युनल, साकेत न्यायालयाने इन्शुरन्स कंपनीला डॉ. खान यांच्या कुटुंबाला २ कोटी ९२ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

रेश्मा बानो यांनी काय म्हटलं आहे?

रेश्मा बानो इंडियन एक्स्प्रेशी बोलताना म्हणाल्या, “मागची दोन वर्षे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूपच कठीण होती. माझ्या आई-वडिलांनी जर मला आणि माझ्या मुलांना सांभाळलं नसतं तर आणखी कठीण परिस्थिती उद्भवली असती. मी त्या कठीण काळातही माझ्या मुलांचं शिक्षण थांबवलं नाही. तसंच त्यांच्या इतर आवश्यक गरजाही पूर्ण केल्या. आता जो निर्णय दिला गेला आहे त्यामुळे मी समाधानी आहे. सर्वात आधी मी या पैशांतून घर बांधणार आहे आणि मुलांच्या शिक्षणासाठी काही पैसे बाजूला ठेवणार आहे.”

मुलांना डॉक्टर करण्याचं दोघांचं स्वप्न आता मी पूर्ण करणार

बानो पुढे म्हणाल्या डॉ. यासीन खान आणि माझं स्वप्न होतं की मुलांना डॉक्टर करायचं. आता भरपाईतली रक्कम मी मुलांच्या शिक्षणासाठीही वापरणार आहे. आमच्या मुलांबाबत आम्ही दोघांनी मिळून पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता माझी आहे, असंही बानो यांनी सांगितलं.

बानो यांचे वकील सुमीत चौधरी काय म्हणाले?

बानो यांचे वकील सुमीत चौधरी म्हणाले, इन्शुरन्स कंपनीने आम्हाला जी ऑफर आधी दिली होती ती स्वीकारार्ह नव्हती. त्यामुळे आम्ही न्याय मिळावा म्हणून आम्ही लढा दिला. डॉ. खान यांच्या कुटुंबाने मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. आता त्यांना जी रक्कम मिळणार आहे त्यामुळे बानो आणि त्यांचं कुटुंब खुश आहे. ही रक्कम त्यांना मुलांच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.