उमाकांत देशपांडे, मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या औसा येथे होणाऱ्या प्रचार सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे सहभागी होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. भाजप-शिवसेना युती झाल्यानंतरही पंतप्रधान मोदी यांच्या महाराष्ट्रातील सभांमध्ये ठाकरे यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चा सरू झाली होती.
शिवसेना-भाजप युती झाल्यावर राज्यातील प्रचाराची पहिली सभा कोल्हापूरला नुकतीच झाली होती आणि या सभेस मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर ठाकरे उपस्थित होते. भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी ठाकरे गांधीनगरलाही गेले होते. या दोन्ही नेत्यांच्या गळाभेटीवरूनही बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. ठाकरे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘विश्वास टाकला, दगा करू नका’, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. अनेक ठिकाणी भाजप-शिवसेना नेत्यांचे मनोमीलन झाले नसून काही कुरबुरी सुरू आहेत. या पाश्र्वभूमीवर मोदी यांच्या सभेसाठी ठाकरे यांच्या गैरहजेरीवरून राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या. भाजपने ठाकरे यांना सभेसाठी आमंत्रित केले नाही की ठाकरे यांनी टाळले आहे, असाही मुद्दा उपस्थित झाला होता.
आता औसा येथील मोदींच्या सभेसाठी ठाकरे उपस्थित राहणार आहेत. ही सभा ८ किंवा ९ एप्रिलला होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
मोदी यांच्या उपस्थितीत ठाकरे मुंबईत २६ एप्रिलला होणाऱ्या संयुक्त प्रचार सभेसही सहभागी होणार आहेत. आपापल्या उमेदवारांचा प्रचार नेत्यांनी करावा, असे युतीमध्ये ठरले आहे आणि काही संयुक्त प्रचार सभा होणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीतही मुंबई व कल्याण येथे दोन संयुक्त प्रचार सभा झाल्या होत्या, असे उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले.
