लंडन : भारताने कोविड १९ प्रतिबंधासाठी तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या लशीचा समावेश ब्रिटनमधील संमत लशींच्या यादीत येत्या २२ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. याचा अर्थ भारतातून जे लोक कोव्हॅक्सिनच्या मात्रा घेऊन आले असतील त्यांना ब्रिटनमध्ये आल्यानंतर विलगीकरणात रहावे लागणार नाही.
जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हॅक्सिनला आपत्कालीन मंजुरी दिल्यानंतर ब्रिटनने हा निर्णय घेतला आहे. कोव्हॅक्सिन लस भारतात वापरलेल्या लशीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोविशिल्ड ही लस भारतात सीरम इन्स्टिटय़ूटने तयार केली होती त्यात ऑक्सफर्ड अॅस्ट्राझेनेका यांनी तंत्रज्ञान हस्तांतर केले होते. ब्रिटनचे भारतातील उच्चायुक्त अलेक्स इलिस यांनी सांगितले की, भारतीयांसाठी एक चांगली बातमी म्हणजे ब्रिटन येत्या २२ नोव्हेंबरला कोव्हॅक्सिन या लशीचा संमत लशींच्या यादीत समावेश करीत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने या लशीला आधीच मान्यता दिली आहे. त्यामुळे आता ही लसही कोविशिल्डच्या रांगेत जाऊन बसली आहे. कोव्हॅक्सिन लशीची मान्यता २२ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजेपासून अमलात येईल. कोव्हॅक्सिन शिवाय चीनच्या सिनोव्हॅक व सिनोफार्म या लशींना मंजुरी देण्यात आली असून या दोन्ही लशींना जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली असून या लशी घेतलेल्या व्यक्तींना ब्रिटनमध्ये येणे शक्य होणार आहे. कारण या लशींनाही मान्यता मिळणार आहे . संयुक्त अरब अमिरात व मलेशियातील लोकांना त्याचा फायदा होणार आहे. या लशी घेतलेल्या व्यक्तींना कुठल्याही चाचणीला सामोरे जावे लागणार नाही व स्वविलगीकरणातूनही सूट देण्यात येणार आहे.