अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला फिलिपिन्समधून अटक!

फिलिपिन्समधून सुरेश पुजारीला अटक करण्यात आली असून त्याला भारताच्या हवाली करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

suresh pujari arrested in phillipines
अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला फिलिपिन्समधून अटक!

कधीकाळी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीसाठी काम करणाऱ्या सुरेश पुजारीला बेड्या ठोकण्यात अखेर मुंबई पोलिसांना यश आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस सुरेश पुजारीच्या मागावर होते. २००७मध्ये सुरेश पुजारीनं भारताबाहेर पलायन केलं होतं. तेव्हापासून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. अखेर, पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं असून सुरेश पुजारीला फिलिपिन्समधून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरेश पुजारीला १५ ऑक्टोबरला अटक करण्यात आली असल्याची माहिती नवभारत टाईम्सनं दिली आहे. आता फिलिपिन्समधून त्याचं भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

…आणि सुरेश पुजारी अलगद जाळ्यात सापडला!

सुरेश पुजारी मुंबई पोलिसांप्रमाणेच एफबीआय आणि सीबीआयच्या देखील रडारवर होता. एफबीआयनंच त्याला संयुक्त कारवाईमध्ये अटक केल्याची माहिती मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महत्त्वाच्या तपास यंत्रणा सुरेश पुजारीच्या मागावर होत्या. गेल्या महिन्यात २१ सप्टेंबर रोजी सुरेश पुजारी फिलिपिन्समध्ये असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. केंद्रीय तपास यंत्रणांनी याची माहिती इंटरपोलला दिल्यानंतर त्याच्या अटकेसाठी पावलं उचलण्यात आली. अखेर त्याला फिलिपिन्सच्या परांकी शहरातून एका इमारतीच्या बाहेर तो उभा असताना अटक करण्यात आली आहे.

कोण आहे सुरेश पुजारी?

सुरेश पुजारी एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीसाठी काम करत होता. सुरेश पुजारी हा मूळचा कल्याणजवळच्या उल्हासनगरचा रहिवासी आहे. २००७मध्ये त्यानं देशाबाहेर पलायन केलं होतं. २०१२च्या सुमारास रवी पुजारीसोबत त्याचे वाद झाल्यानंतर त्यानं पुजारी गँग सोडून आपली नवी गँग बनवली होती. नवी मुंबई, ठाणे, मुंबई या भागातल्या डान्स बार चालकांना खंडणीसाठी सुरेश पुजारी गँगचे फोन येत असत. तसेच, खंडणी न देणाऱ्यांची हत्या झाल्याच्याही काही घटना समोर आल्या आहेत. २०१८मध्ये सुरेश पुजारीच्या शूटर्सनी कल्याण-भिवंडी महामार्गावरच्या के. एन. पार्क हॉटेलमध्ये गोळ्या चालवल्या होत्या. यात रिसेप्शनवरील एक कर्मचारी जखमी देखील झाला होता.

अंडरवर्ल्डचा खात्मा?

सुरेश पुजारीच्या अटकेमुळे अडरवर्ल्डमधील जवळपास सर्वच मोठे डॉन अटकेत आले आहेत. छोटा राजन, रवी पुजारी, एजाज लकडावाला यांना देखील भारताच्या हवाली करण्यात आलं आहे. दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर आणि त्याच्या भाच्याच्या अटकेमुळे डी गँगच्या कारवाया देखील काहीशा कमी झाल्याचं दिसत आहे. दाऊद गँगकडून खंडणीसाठी येणारे कॉलही गेल्या काही काळापासून बंद असल्याची माहिती मिळत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Underworld don suresh pujari arrested in philippines handed over to india pmw

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या