उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मास्क न घातल्याने बँक ऑफ बडौदाच्या सुरक्षारक्षकाने एका व्यक्तीला गोळी मारली. या दुर्घटनेत व्यक्ती गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमी व्यक्ती बरेलीतील रेल्वे कॉलनी राहणारा असून राजेश कुमार असं त्याचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुरक्षारक्षक केशव प्रसाद याला अटक केली आहे.

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील जंक्शनजवळ रेल्वे कॉलनीत राहणारा राजेश कुमार टीएमसी विभागात कर्मचारी आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता राजेश स्टेशन रोडवरील बँक ऑफ बडौदाच्या शाखेत पासबुक अपडेट करण्यासाठी गेला होता. तेव्हा राजेशने मास्क न घातल्याने सुरक्षारक्षकाने त्याला रोखलं आणि बँकेत जाण्यास मनाई केली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. यानंतर सुरक्षारक्षकाने थेट बंदूक काढत राजेशच्या पायावर गोळी मारली. त्यानंतर जखमी राजेशला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर सुरक्षारक्षक केशव प्रसाद याला अटक करण्यात आली आहे.

सुरक्षारक्षकाने गोळी मारल्याने बँकेत एकच खळबळ उडाली. त्यानंतर तात्काळ याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. गोळी पायाला लागल्याने राजेशच्या पायाचं हाड तुटलं आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या प्रकरणानंतर बँकेनं घडलेला प्रकार दुर्दैवी असल्याचं सांगत जखमी राजेशला सर्वोतोपरी मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्याचबरोबर पोलिसांना सहकार्य करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं असून आरोपीची कसून चौकशी केली जात आहे.