उत्तर प्रदेशमध्ये मतदानाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. सकाळपासून युवक, महिला, ज्येष्ठ सर्वांनी मतदान केले. उत्तर प्रदेश येथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संगीत सोम यांचे भाऊ गगन सोम हे बूथवर बंदूक घेऊन आले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळी नऊ वाजता गगन सोम सरधना मतदार संघाच्या एका मतदान केंद्रावर आले. त्यांची झडती घेण्यात आली तेव्हा त्यांच्याकडे बंदूक आढळली. गगन सोम यांच्याजवळ असणारी बंदूक ही परवान्याची बंदूक होती. परंतु आदर्श आचारसंहितेनुसार बंदूक पोलिसांजवळ जमा करणे हे बंधनकारक असते. केवळ काही अपवाद वगळता तुम्हाला मतदान केंद्रात बंदूक नेण्याचा अधिकार नाही असे पोलिसांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. मुजफ्फरनगर, बागपत, मेरठ, गाजियाबाद, गौतमबुद्धनगर, हापुड, बुलंदशहर, अलीगढ, मथुरा, हाथरस, आगरा, फिरोजाबाद, एटा आणि कासगंज या जिल्ह्यातील ७३ मतदारसंघामध्ये मतदान होत आहे.  पहिल्या टप्प्यात १ कोटी १७ लाख मतदार या महिल्या आहेत. एकूण मतदार २ कोटी ६० लाख आहेत. या मतदारसंघांमध्ये एकूण ८३९ उमेदवार आपले नशीब आजमावून पाहत आहेत. गाजियाबाद जिल्ह्यातील साहिबाबाद हा सर्वाधिक जास्त मतदार असणारा मतदार संघ आहे. तर एटा जिल्ह्यातील जलेसर हा सर्वात छोटा मतदार संघ आहे. मतदारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी गुलाबाचे फूल देऊन मतदारांचे स्वागत केले.

तर बुलंदशहर शहरामध्ये प्रथम मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. महाविद्यालयीन तरुणींनी एकत्र येऊन मतदान केले. पहिल्यांदा मतदान करण्याचा आनंद आणि अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.