scorecardresearch

“ते आम्हाला त्रास देतायत…”; कुख्यात गुंड विकास दुबेच्या पत्नीचे योगी आदित्यनाथांवर गंभीर आरोप, म्हणाली…

अद्याप आपल्या नवऱ्याचा मृत्यूचा दाखलाही आपल्याला कोणी देत नसल्याचा आरोपही विकास दुबेच्या पत्नीने केला आहे.

उत्तरप्रदेशातला कुख्यात गँगस्टर विकास दुबेची पत्नीने योगी सरकारवर गंभीर आरोप केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप विकास दुबेची पत्नी रिचा दुबे यांनी केला आहे. आमचं कुटुंब हेलपाटे घालतंय पण सुनावणी होत नसल्याचंही दुबेंनी म्हटलं आहे.कानपूरमध्ये बिकरू भागात ८ पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केल्याचा आरोप विकास दुबेवर होता. या हत्याकांडानंतर पोलिसांनी केलेल्या एनकाऊंटरमध्ये विकास दुबे मारला गेला होता.

विकास दुबेची पत्नी रिचा दुबे यांनी म्हटलं आहे की, आम्हाला खूप वाईट पद्धतीने छळलं जात आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला माघार घेण्यास प्रवृत्त केलं जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही गोष्ट स्वतःवर घेतली असून ते आम्हाला त्रास देत आहेत. आजपर्यंत मला माझ्या नवऱ्याच्या मृत्यूचा दाखला मिळालेला नाही. कोणाला विचारलं तर सांगतात की हे प्रकरण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं आहे. सुनावणी होत नाहीये. आम्ही दवाखान्यापासून पोस्टमार्टम हाऊसपर्यंत सगळीकडे नुसते हेलपाटे घालतोय.

रिचा दुबेने पुढे सांगितलं, माझे वयोवृद्ध सासू सासरेही न्यायाच्या प्रतिक्षेत भटकत आहे. माझ्या दिराची मुलं शिकू शकत नाहीयेत. आमच्याकडे जगण्यासाठी कोणतंच साधन शिल्लक नाही. आमच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. भाजपाचे लोक आमच्या जमिनी आणि शेती लाटत आहे. राजू वाजपेयी नावाच्या एका व्यक्तीने आपली जमीन लाटल्याचा आरोप रिचा दुबेने केला आहे.
शासन, प्रशासन कोणीही आमचं ऐकून घ्यायला तयार नाही. परिस्थिती तर अशी आहे की शेतात धान्य तर आहे, पण ते विकलंच जात नाहीये. कारण काय तर हे पीक विकास दुबेच्या शेतातलं आहे. आम्हाला यामुळे आता जगणं मुश्किल होऊन बसलं आहे, असं रिचा दुबेने सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Up gangster vikas dubey wife richa up cm yogi adityanath vsk

ताज्या बातम्या