Social Media Reaction On US H 1B Visa Policy: वाढते कर, सुरक्षेच्या चिंता आणि कडक इमिग्रेशन नियमांमुळे परदेशातील भारतीयांना कुठे राहायचे आणि कुठे नोकरी करायची याचा पुनर्विचार करावा लागत आहे. जास्त कर आणि सुरक्षिततेच्या चिंतांमुळे कुशल भारतीयांसाठी पसंतीचं ठिकाण असलेल्या ब्रिटनमधून आधीच अनेकांना बाहेर पडावे लागले आहे. आता तर अमेरिकेनेही नुकतेच एच-१बी व्हिसा शुल्क वाढवले, ज्यामुळे भारतीयांना अमेरिकन व्हिसा मिळवणे आता आणखी कठीण होणार आहे.
अमेरिकेतील एच-१बी शुल्क वाढीमुळे भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांना मायदेशी परतण्यास भाग पाडले जाईल, असे काहींना वाटते. पण, आयआयटी मुंबईच्या माजी विद्यर्थिनी असलेल्या डॉ. राजेश्वरी अय्यर यांनी म्हटले आहे की, एकही अनिवासी भारतीय पुन्हा मायदेशी येण्याच्या पर्यायाचा विचार करत नाही. त्या म्हणाल्या की, आता बरेच जण दुबई, सिंगापूर, जपान, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड आणि नॉर्डिक राष्ट्रांसारख्या देशांमध्ये स्थलांतरित होत आहेत. ही ठिकाणे सुरक्षितता, गुणवत्तेवर आधारित संधी आणि चांगल्या दर्जाचे जीवनमान देण्याचे आश्वासन देतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुद्दुचेरीच्या माजी विद्यार्थी असलेल्या डॉ. राजेश्वरी अय्यर या अनिवासी भारतीय आहे.
“…याचे उत्तर शोधण्याची गरज”
एक्सवर लिहिलेल्या सविस्तर पोस्टमध्ये डॉ. राजेश्वरी अय्यर म्हणाल्या की, “वाढते कर आणि सुरक्षिततेच्या चिंतेमुळे अनिवासी भारतीय आधीच ब्रिटन सोडत आहेत आणि आता अमेरिकेतही एच-१बी शुल्कात वाढ झाल्याने बरेच लोक अमेरिकाही सोडत आहेत. ते दुबई, सिंगापूर, जपान, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड आणि नॉर्डिक देशांमध्ये स्थलांतरित होत आहेत जे सुरक्षा, गुणवत्तेवर आधारित संधी आणि चांगल्या दर्जाचे जीवनमान देण्याचे आश्वासन देतात. दरम्यान, एकही अनिवासी भारतीय पुन्हा मायदेशी परतण्याचा विचारही करत नाही. का? हाच प्रश्न आहे ज्याचे उत्तर आपल्याला शोधण्याची गरज आहे.”
“गांभीर्याने पावले उचलली पाहिजेत”
त्यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, भारताने आपली प्रतिभा टिकवून ठेवण्यासाठी गंभीर पावले उचलली पाहिजेत. “अमेरिका भारतीय प्रतिभेसाठी आपले दरवाजे बंद करू शकते, तरीही जगात संशोधन-केंद्रित, गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणारे देश आहेत. परंतु खरे ध्येय भारताला नवोपक्रम, गुणवत्तेचे आणि संधीचे केंद्र बनवणे हे असले पाहिजे”, असे त्यांनी म्हटले आहे.
“फुकट योजना, जात आणि धर्मावर आधारित आरक्षण…”
डॉ. राजेश्वरी अय्यर यांनी यावेळी असाही, सल्ला दिला की भारताने ‘फुकट योजना, जात आणि धर्मावर आधारित आरक्षण आणि वाढता भ्रष्टाचार’ यांपासून दूर जावे आणि त्याऐवजी संशोधन व विकास, कौशल्यविकास तसेच उच्च तंत्रज्ञान आणि नवोन्मेषावर आधारित नोकऱ्यांवर लक्ष केंद्रित करावे.