सध्या देशात करोनाचं थैमान वाढत आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. “हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे. २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेलं हे २० कोटींचं पॅकेज स्वावलंबी योजनेला नवी गती देईल”. हे पॅकेज जीडीपीच्या १० टक्के असल्याचंही मोदी म्हणाले होते. तसंच याबाबत अधिक माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन देतील असं त्यांनी सांगितलं होतं. यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणतीही कठोर किंवा वाईट बातमी देशासमोर द्यायची नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर त्यांनी हे सर्व सोडून दिलं आहे. कदाचित हा त्यांच्या पीआरचा भाग असावा,” अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. “जर पंतप्रधानांना काही ठोस सांगायचंच नसेल तर ते लाईव्ह येऊन गोंधळ निर्माण करतातच का?” असा सवालही त्यांनी केला आहे.

“पंतप्रधानांनी संघटीत मध्यमवर्गासाठी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. पण असंघटीत आणि स्थलांतरीत कामगारांच्या हाती निराशाच आली आहे. मध्यम वर्गाची बाजू घेण्याची आणि आर्थिक दुर्बल वर्गाकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात दिसून आली. परंतु याची पुनरावृत्ती चौथ्या टप्प्यातही करण्यात येत आहे,” असं आंबेडकर म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanchit bahujan aghadi prakash ambedkar criticize pm narendra modi live speech coronavirus lockdown jud
First published on: 13-05-2020 at 10:43 IST