कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या विराजमान होणार आहेत तर डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री होणार आहेत यावर आत्ता शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा पेच सोडवणं काँग्रेससाठी सोपं नव्हतं. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु होती. माझ्यासोबत १३६ आमदार आहेत असं डीके शिवकुमार यांनी ठणकावून सांगितलं होतं. तसंच राहुल गांधींना भेटल्यानंतरही ते उपमुख्यमंत्री व्हायला तयार नव्हते असंही सांगतिलं जातं आहे. अशात सोनिया गांधींनी शिष्टाई केली आणि डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपद घेण्यास सहमती दर्शवली. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा पेच संपुष्टात आला. आता उद्या २० मे रोजी शपथविधी होणार आहे. या शपथविधीला देशभरातील अनेक नेत्यांना आमंत्रणं पाठवण्यात आली आहेत.

२२४ पैकी १३५ जागावंर दणदणीत विजय मिळवून काँग्रेसने कर्नाटकवर सत्ता काबीज केली. परंतु, निवडणूक जिंकल्यानंतरही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नव्हता. डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात चूरस निर्माण झाली. तब्बल ४८ तासांहून अधिक काळ मुख्यमंत्री कोण यावर शिक्कामोर्तब होई ना. हायकमांड, अध्यक्ष, निरीक्षण समिती आदींमध्ये बैठका होत अखेर यावर पडदा पडला आणि सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री करायचं ठरवलं आहे. दरम्यान, उद्या २० मे रोजी कर्नाटकात शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी अनेक मंत्रीही मंत्रीपदाची शपथ घेतील.

हेही वाचा >> Video : कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर डी. के. शिवकुमार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

या शपथविधी सोहळ्याला सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. तर, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार एनसी अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनाही आमंत्रण पाठवण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

सिद्धरामय्या हे कर्नाटकच्या राजकारणातलं मोठं नाव आहे. पेशाने वकील असणारे सिद्धरामय्या हे १९७८ पासून सक्रिय राजकारणात आहेत. सिद्धरामय्यांच्या आई वडिलांना वाटत होतं की त्यांनी डॉक्टर व्हावं. मात्र सिद्धरामय्यांनी वकील व्हायचा निश्चय केला. त्यानंतर वकिली सोडून ते राजकारणात आले. भूकमुक्त कर्नाटक हे त्यांच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ते वाटचाल करु लागले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.