Vladimir Putin Poop Suitcase : जगातील सर्वात शक्तीशाली दोन देशांचे प्रमुख डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांनी काही दिवसांपू्र्वी अलास्का येथे एकमेकांची भेट घेतली. इतकेच नाही तर या दोन नेत्यांच्या हलचालींकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते.या नेत्यांच्या सर्व हालचालींवर कॅमेऱ्याच नजर होती. दोन महाशक्तींचे नेते भेटत असल्याने यावेळी सुरक्षेची तयारी देखील चोख असणार हे निश्चितच होते. यावेळी राष्ट्रध्यक्षांच्या ताफ्याबरोबर अनेक अधुनिक शस्त्रात्रे देखील होती, मात्र या सगळ्यात एका सूटकेसची विशेष चर्चा होताना दिसत आहे. ही खास सूटकेस कागदपत्रे किंवा शस्त्रे वाहून नेण्यासाठी नाही तर नेत्याची विष्ठा गोळा करण्यासाठी आणि वाहून नेण्यासाठी डिझाइन केलेली आहे.

नेमकं कारण काय?

एक्सप्रेस यूएसमध्ये देण्यात आलेल्या एका वृत्तानुसार, ही सूटकेस रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या परदेश प्रवासादरम्यानच्या दिनचर्येचा भाग राहिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर अलास्का येथील परिषदेच्यावेळी पुतिन यांचा अंगरक्षक अशी एक सूटकेस घेऊन बरोबर होता असे सांगितले जात आहे. ही सूटकेस बरोब ठेवण्याची पद्धत एक प्रकारे पुतिन यांच्या अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेची निशाणी बनली आहे. या सूटकेसचा उद्देश नेत्याच्या गोपनियतेचे संरक्षण करणे आणि विष्ठेच्या नमुन्यांमधून परकीय शक्तींना त्यांच्या आरोग्याबद्दल माहिती मिळू नये हा आहे

पुतिन यांच्या परराष्ट्र दौऱ्यावेळी त्यांची विष्ठा गोळा करणे आणि ती वाहून घेऊन जाण्याचा ही पद्धत अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे सांगितले जाते. ‘पॅरिस मॅच’ या एका फ्रेंच पब्लिकेशनसाठी लिहिणाऱ्या शोध पत्रकारांनी ही बाब उजेडात आणली होती की, रशियाच्या फेडरल प्रोटेक्शन सर्व्हिस (FSO) च्या सदस्यांना राष्ट्राध्यक्षांची विष्ठा आणि मूत्र एका खास तयार करण्यात आलेल्या पाकिटामध्ये गोळा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ही विष्ठा नंतर एका विशिष्ट सूटकेसमध्ये ठेवली जात असे आणि मॉस्को येथे परत आणली जात असे. पुतिन यांच्या २०१७ सालच्या फ्रांस आणि २०१९ च्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावेळी देखील ही खबरदारी घेण्यात आली होती.

माजी डीआयए इंटेलिजन्स अधिकारी रिबेका कोफ्फलर (Rebekah Koffler) यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना सांगितले की, पुतिन यांना भीती आहे की परकीय इंटेलिजन्स सर्व्हिसेस त्यांच्या आरोग्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी कदाचित त्यांच्या विष्ठेचे विश्लेषण करतील.

विशेष बाब म्हणजे पुतिन यांची ही भीती विनाकारण नाही. कारण ७२ वर्षीय पुतिन यांच्या आरोग्याबद्दल माध्यमांमध्ये अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या अफवा ऐकायला मिळत आहे. पुतिन यांना पार्किन्सन सारखा न्युरोलॉजिकल आजार असल्याची शक्यात अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली होती.

राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी देश कुठल्या थराची सुरक्षा व्यवस्था करू शकतात याचे विष्ठा वाहून नेण्यासाठी असलेली ही सूटकेस एक उत्तम उदाहरण आहे. पुतिन यांच्याबाबत बोलायचे झाल्यास यातून पुतिन त्यांची गोपनियता आणि वैयक्तिक माहिती उघड होणार नाही याबाबत किती काळजी घेतात हे दिसून येते.