मुंबई / नवी दिल्ली : चौथ्या टप्प्यात राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये आज, सोमवारी मतदान होणार आहे. ११ पैकी नऊ मतदारसंघ सध्या महायुतीकडे असून ते कायम राखण्याचे आव्हान सत्ताधाऱ्यांपुढे असेल. त्यात अंतरिम जामिनावर बाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘पंचाहत्तरी’चा मुद्दा शनिवारी उपस्थित केल्यानंतर रविवारी ‘केजरीवाल की गॅरंटी’ देत त्यांनी भाजपला आव्हान दिले आहे. या मुद्द्यांचा राज्यातील पुढील दोन टप्प्यांत प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

नंदुरबार, जळगाव, रावेर, नगर, शिर्डी, बीड, औरंगाबाद, जालना, पुणे, शिरूर आणि मावळ या ११ मतदारसंघांत सोमवारी मतदान होणार आहे. यापैकी शरद पवार गटाकडील शिरूर आणि एमआयएमकडील औरंगाबादची जागा वगळता सर्व विद्यामान खासदार महायुतीत असून या जागा कायम राखण्याचे आव्हान असेल. पहिल्या तीन टप्प्यांत राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान झाले असून आपल्या अधिकाधिक मतदारांना बाहेर काढण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर असेल.

हेही वाचा >>>अभिनेता अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल; मित्रासाठी निवडणूक प्रचार करणे पडले भारी

एकीकडे राज्यात महायुती आणि मविआमधील चुरस, वाद वाढीला लागला असताना केजरीवाल यांनी नवा मुद्दा उपस्थित करून सत्ताधाऱ्यांची पुरती कोंडी केली आहे. ‘पुढील वर्षी मोदी ७५ वर्षांचे होत असून त्यांच्या जागी अमित शहा पंतप्रधान बनतील,’ असा दावा त्यांनी शनिवारी केला. भाजप प्रामुख्याने मोदींचा चेहरा समोर ठेवून मते मागत असताना या विधानामुळे राज्यातील उर्वरित २३ मतदारसंघांसह दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश या उत्तरेतील राज्यांच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर स्पष्टीकरणे देताना भाजप नेत्यांनी पुरती दमछाक होत असल्याचे दिसते. केजरीवालांच्या दाव्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना हैदराबादमध्ये तातडीने खंडन करावे लागले. ‘पंचाहत्तरी पार केल्यानंतरही मोदीच पंतप्रधानपदी कायम राहतील’, असे त्यांनी जाहीर केले. तर ‘निदान मोदी पंतप्रधान होणार हे तरी केजरीवालांनी मान्य केले’, अशी मोजकी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी दिली. दुसरीकडे ‘केजरीवाल की गॅरंटी’ देत चीनने बळकावलेली जमीन परत मिळविणे, दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा आदी १० आश्वासने ‘आप’ने दिली आहेत.

केजरीवालांचा मोदींबाबत दावा काय?

२०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, भाजपने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या नेत्यांना राजकारणातून निवृत्त करण्याचा नियम केला. याआधारे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते ‘मार्गदर्शक मंडळा’त गेले. पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये मोदींना ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने या नियमानुस मोदींनी निवृत्ती घेऊन भाजपच्या मार्गदर्शक मंडळात गेले पाहिजे, असे केजरीवालांनी अप्रत्यक्षपणे सुचविले आहे. तसे झाले तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवे पंतप्रधान होतील. त्यापेक्षा मतदारांनी भाजपला मते देऊ नये, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.