रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आज आठव्या दिवशीदेखील सुरूच आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. तर अनेक देशांनी त्यांची हवाई हद्द रशियासाठी बंद केली. युद्ध सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय ज्युदो फेडरेशनने पुतिन यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी देखील केली होती. दरम्यान, पुतिन यांना आणखी एक धक्का बसला आहे.

आज गुरुवारी ३ मार्च रोजी पॅरिसमधील ग्रेविन संग्रहालयातून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा मेणाचा पुतळा हटवण्यात आला आहे. पॅरिसमधील ग्रेविन संग्रहालयाचे संचालक म्हणाले, “आम्ही ग्रेविन संग्रहालयात हिटलरसारख्या हुकूमशहाचे प्रतिनिधित्व केले नाही. त्यामुळे आता आम्ही पुतिनचे यांचे प्रतिनिधित्व करू इच्छित नाही. आम्ही पहिल्यांदाच एखाद्या नेत्याचा पुतळा बसवल्यानंतर हटवला आहे.” यासंदर्भात एएफपी या वृत्तसंस्थेने वृत्त दिलंय.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्याच्या शेवटी संग्रहालयाला भेट देणारे पर्यटक आणि इतर काही जणांनी पुतळ्यावर हल्ला केला. “जे घडले ते पाहता, आम्ही आणि आमचे कर्मचारी दररोज तो पुतळा नीट करू इच्छित नाहीत,” असे संग्रहालयाचे संचालक डेलहोम्यू म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अहवालात पुढे म्हटले आहे की, संग्रहालय पुतिन यांच्या पुतळ्याच्या जागी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचा पुतळा बसवण्याचा विचार करत आहे. “कदाचित राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की पुतिन यांची जागा घेतील. रशियाचा विरोध केल्यामुळे आणि संकटात देश न सोडता लढत असल्यामुळे झेलेन्स्की हिरो बनले आहे. येत्या काळात ते इतिहासात आणि आजच्या महापुरुषांमध्ये त्यांच स्थान निश्चित करतील,” असं ते म्हणाले.