१६ एप्रिल-हिमांशी आणि विनय नरवाल यांचं लग्न
१९ एप्रिल- हिमांशी आणि विनय यांच्या लग्नाचं रिसेप्शन
२१ एप्रिल-हिमांशी आणि विनय काश्मीरला मधुचंद्रासाठी रवाना
२३ एप्रिल- करनाल या ठिकाणी विनय नरवाल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

या नुसत्या तारखा नाहीत. विनय नरवाल यांची दहशतवाद्यांनी हत्या केल्याने या तारखा त्यांची पत्नी हिमांशीच्या मनावर हे सगळे अनुभव कोरले गेले आहेत. पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हिमांशीच्या समोर नौदल अधिकारी विनय नरवाल यांची हत्या करण्यात आली. सहा दिवसांपूर्वी या दोघांचं लग्न झालं होतं. सुखी संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या जोडप्यामधला विनय जगाचा निरोप घेऊन कायमचा निघून गेला. ते देखील त्याची काहीही चूक नसताना. विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी यांनी त्यांच्या वेदनांना वाट करुन दिली. तसंच नरवाल कुटुंबानेही आपल्या भावना व्यक्त केल्या.

विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाला होता

दहशतवादी हल्ला झाल्यानंतर काही फोटो आणि व्हिडीओ प्रसारित झाले. त्यातला एक व्हिडीओ हिमांशी नरवाल यांचा होता. हिमांशी नरवाल म्हणाली, “मी माझ्या नवऱ्यासह म्हणजेच विनयसह भेळ खात होते. तेवढ्यात एक माणूस आला मला म्हणाला विनय मुस्लिम आहे का? त्यावर विनयने नाही मी मुस्लिम नाही असं सांगितलं.ज्यानंतर तातडीने विनयला त्या माणसाने गोळ्या घातल्या आणि ठार मारलं. ” विनय नरवाल यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी त्यांची पत्नी हिमांशी म्हणाली “आमच्या लग्नानंतर सुरु झालेलं एक सुंदर स्वप्न इतकं भीषण आणि भेसूर रुप घेईल असं वाटलं नव्हतं. आमचं लग्न झालं, त्यानंतर मधुचंद्रासाठी आलो, काश्मीरमध्ये हल्ल्यात विनयची हत्या झाली आणि आता त्याच्या पार्थिवावर अंत्यस्स्कार. सगळं सहा दिवसात घडलंय, काही सुचत नाही.”

विनय नरवाल ४० दिवसांच्या सुट्टीवर

नौदलात लेफ्टनंट म्हणून कार्यरत असलेले विनय नरवाल यांचं लग्न ठरल्याने त्यांनी ४० दिवसांची सुट्टी घेतली होती. ४ एप्रिलला हिमांशी आणि विनय यांचा साखरपुडा झाला. हिमांशी आणि विनय या दोघांचं लग्न १६ एप्रिलला झालं. यानंतर हे दोघंही २१ एप्रिलला विमानाने काश्मीरला आले. मधुचंद्रासाठी आलेल्या या नवविवाहित जोडप्यावर हल्ला झाला. ज्यात विनय नरवाल मारले गेले. विनय यांच्या शेजाऱ्यांनी सांगितल्यानुसार १ मे रोजी विनय यांचा २७ वा वाढदिवस होता. त्याआधीच त्याचा मृत्यू झाला.

विनय नरवाल यांच्या आजोबांनी काय म्हटलं आहे?

“माझ्या नातवाच्या बाबतीत असं काही घडेल हे मला कधीही वाटलं नव्हतं. विनय लहान होता तेव्हापासून सुरक्षा दलांपैकी एका दलात जायचं हे त्याचं लक्ष्य होतं. तो सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची परीक्षा देऊन तीन वर्षांपूर्वी नौदलात रुजू झाला होता.” विनयचे वडील राजेश कुमार हे पानिपत येथील कस्टम विभागात कार्यरत आहेत. तर त्याची आई गृहिणी आहे. त्याची बहीण सृष्टी ही सिव्हिल सर्व्हिसच्या परीक्षांसाठी तयारी करते आहे.

हिमांशीचे वडील काय म्हणाले?

विनय नरवाल यांच्या लग्नासाठी सगळं कुटुंब एकत्र आलं होतं. सगळे खूपच आनंदात होते पण त्यांना हा दिवस बघावा लागला. विनय नरवाल यांची हत्या झाल्यानंतर हिमांशीचे वडील सुनील कुमार म्हणाले, “एक दिवसापूर्वी तिला हिरवा चुडा आणि मेंदी लावलेल्या हातांनी पाहिलं होतं. आता तिचं सांत्वन कसं करायचं मलाच सुचत नाही.”

विनयच्या बहिणीचा प्रश्न काय?

विनयची बहीण सृष्टीनेही प्रश्न विचारला आहे की माझ्या भावाची हत्या का झाली? त्याची चूक काय होती? अत्यंत शोकाकुल वातावरणात विनय नरवाल यांच्या पार्थिवावर करनाल या ठिकाणी अंत्यसंस्कार पार पडले. विनय नरवाल अमर रहे, पाकिस्तान मुर्दाबाद, भारतमाता की जय या घोषणा त्यावेळी देण्यात आल्या. विनय नरवाल यांच्या आप्तेष्टांनी आणि मित्रांनी सांगितल्यानुसार विनय आणि त्यांची पत्नी हिमांशी हे दोघंही स्वित्झर्लंड या ठिकाणी मधुचंद्राला जाणार होते. मात्र विनयला देशाबाहेर जाण्याची संमती नौदलाकडून मिळाली नाही त्यामुळे या दोघांनी आपसात चर्चा करुन काश्मीरला मधुचंद्रासाठी जायचं हे नक्की केलं होतं. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना काय वाटत असेल याची कल्पनाही करवत नाही असं विनय यांच्या शेजाऱ्यांनी म्हटलं आहे.