पीटीआय, कोलकाता, नवी दिल्ली
पश्चिम बंगालमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भाजपच्या नेत्यांवर जमावाने हल्ला करण्याची घटना घडली. यामध्ये भाजपचे एकूण दोन आमदार आणि एक खासदार यांना लक्ष्य करण्यात आले आहे. यावरून राज्यात तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप यांच्यादरम्यान पुन्हा एकदा जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल आनंद बोस यांनी रुग्णालयात जाऊन खासदार खागेन मुर्मू यांची भेट घेतली.

भाजप आमदार मनोज कुमार ओरॉन हे मंगळवारी त्यांच्या कुमारग्रामचे मतदारसंघातील अलिपूरद्वार येथे पूरग्रस्तांना मदतसामग्रीचे वाटप करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. हा हल्ला तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा दावा ओरॉन यांनी केला. जलपाईगुडी जिल्ह्यात खासदार झागेन मुर्मू आणि आमदार शंकर घोष यांच्यावर हल्ला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा प्रकार घडला आहे.

अलिपूरद्वार येथे जमावाने केलेल्या हल्ल्यात ओरॉन जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. “मी पूरग्रस्तांना मदत करायचा प्रयत्न करत होतो तेव्हा अचानक मला घेराव घालण्यात आला आणि मारहाण झाली,” अशी माहिती ओरॉन यांनी दिली. मात्र, ओरॉन यांचे आरोप निराधार असल्याचे सांगत तृणमूल काँग्रेसने हे आरोप फेटाळले. दरम्यान, खासदार मुर्मू यांना झालेल्या मारहाणाची लोकसभा सचिवालयाने गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून यासंबंधी माहिती मागवावी आणि तीन दिवसांच्या आत आम्हाला द्यावी, असे संसदेच्या अधिकाऱ्यांनी कळवले आहे.

‘एनआयए’ चौकशीची मागणी

मुर्मू आणि घोष यांच्यावरील हल्ल्याची राष्ट्रीय तपास संस्थेमार्फत (एनआयए) चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. उत्तर बंगालमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी आणि लोकांमध्ये धर्माच्या आधारे विभागणी करण्यासाठी मुर्मू आणि घोष यांच्यावर हल्ले करण्यात आले, तसेच हे हल्ले बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांमार्फत करण्यात आले, असा दावा भट्टाचार्य यांनी केला.

तृणमूल काँग्रेसला मानवतेची भाषा समजत नाही, त्यांना केवळ दहशतीची भाषा समजते. उत्तर बंगालची जनता मदतीच्या प्रतीक्षेत असताना तृणमूल काँग्रेस दहशत आणि हिंसा पसरवण्यात दंग आहे. तृणमूल काँग्रेसचे राजकारण दुसरे काही नसून गुंडगिरी, असत्य आणि द्वेष आहे. – पश्चिम बंगाल भाजप