West Bengal decide to close Schools : देशभरात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाने काळजीचं वातावरण तयार केलंय. मागील काही दिवसांपासून झपाट्याने करोना रूग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये नव्याने ४ हजार ५१२ करोना रूग्ण आढळल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार पश्चिम बंगालमध्ये सोमवारपासून (३ जानेवारी) राज्यातील शाळा बंद करण्यात येणार आहेत.

पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खासगी व सरकारी कार्यालयांमधील उपस्थितीवरही ५० टक्क्यांचे निर्बंध लावले आहेत. याशिवाय पश्चिम बंगाल सरकारने दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवर रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंतचा कर्फ्यु देखील लावला आहे. या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी असणार आहे.

या निर्णयामुळे सोमवारपासून (३ जानेवारी) पश्चिम बंगालमध्ये शाळा, महाविद्यालयांसोबतच जलतरण तलाव, व्यायामशाळा, ब्युटी सलून्स देखील बंद राहतील.

महाराष्ट्रात ९ हजार १७० नवीन करोनाबाधित आढळले

दरम्यान, महाराष्ट्रात देखील करोना संसर्ग पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या रूग्णांची संख्या ही मोठ्याप्रमाणावर दिसून येत आहे. शिवाय, ओमायक्रॉनचे रूग्ण देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून कडक पावलं उचलली जात असून, निर्बंध अधिक कठोर केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. शनिवारी (१ जानेवारी) दिवसभरात ९ हजार १७० नवीन करोनाबाधित आढळल्याचे समोर आले आहे. तर, मुंबईत ६ हजार ३४७ नव्या करोनाबाधितांची आज नोंद झाली आहे. याशिवाय राज्यात ७ करोनाबाधित रूग्णांचा तर मुंबईत एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.

हेही वाचा : COVID 19 : राज्यात ९ हजार १७० नवीन करोनाबाधित आढळले ; मुंबईत सहा हजारांहून अधिक रूग्णांची नोंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात १ हजार ४४५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,१०,५४१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिक्व्हरी रेट ) ९७.३५ टक्के एवढे झाले आहे.