उत्तर प्रदेशला पुराचा फटका बसला आहे. राज्यातील अनेक जिल्हे पाण्याखाली असून लोकांचं प्रचंड नुकसान झालंय. अनेक गावं पूर्णतः पाण्याखाली असून लोकांना अन्न आणि पाणीदेखील मिळत नाहीये. पीलीभीत, बरखेडा, बीसलपुर, पूरनपुर आणि बहेडी भागात शेतमाल नष्ट झाला आहे. या शेतकऱ्यांना आणि परिसरातील नागरिकांच्या मदतीसाठी भाजपाचे पिलीभीतचे खासदार वरुण गांधी सरसावले आहेत. त्यांनी पुराचा फटका बसलेल्या लोकांना राशन पुरवलं आहे.

“तराईच्या बऱ्याच भागाला पुराचा फटका बसला आहे, त्यामुळे परिस्थिती खराब आहे. हे नैसर्गिक संकट संपेपर्यंत कोणतेही कुटुंब उपाशी राहू नये म्हणून हाताने कोरडे रेशन दान करतोय. जेव्हा सर्वसामान्य माणसाला सरकारच्या मदतीची सर्वात जास्त गरज असते, तेव्हा त्याला स्वतःच आपला बचाव करावा लागतो, मदत शोधावी लागते हे वेदनादायी आहे. जर सर्व त्यानेच करायचं असेल तर मग सरकार काय कामाचं?,” असा सवाल वरुण गांधी यांनी विचारला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देण्यात यावं, अशी मागणी करत बुधवारी खासदार वरुण गांधी यांनी मुख्यमंत्री यागी आदित्यनाथ यांना पत्र पाठवले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवलेल्या पत्रात गांधी म्हणाले, “माझा मतदारसंघ कृषी प्रधान आहे. ज्या अंतर्गत पिलीभीत, बरखेडा, बिसालपूर, पूरनपूर आणि बहेडी हे भाग येतात. दोन दिवसांपासून या भागात पुरामुळे बरेच नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील भात पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. याशिवाय ऊस आणि इतर पिकांचही नुकसान झालंय. त्यामुळे या भागातील पिकांचे आणि पशु नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात करा आणि शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई द्या. तसेच पीक विमा, पीलीभीत आणि इतर लगतच्या जिल्ह्यांसाठी विशेष पॅकेज द्या,” अशी मागणी त्यांनी केली होती.