White House remark on Rumoured invitation to Pakistan Army chief : दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला जगात एकटं पाडण्याचा प्रयत्न भारताकडून होत असतानाच पाकिस्तानचे लष्करप्रमुख सय्यद असीम मुनीर यांना अमेरिकेच्या ‘आर्मी डे’साठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिल्याचं वृत्त अनेक पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. याच वृत्तांच्या हवाल्याने भारतासह दक्षिण आशियातील वृत्तवाहिन्यांनी हेच वृत्त प्रसिद्ध केलं. मात्र हे वृत्त खोटं असल्याचं व्हाइट हाऊसने स्पष्ट केलं आहे. अमेरिकन लष्कराच्या परेडसाठी असीम मुनीर यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलेलं नाही, असं व्हाइट हाऊसने स्पष्ट केलं आहे.
व्हाइट हाऊसमधील एका मोठ्या अधिकाऱ्याचा व 5WH च्या वृत्ताचा हवाला देत दी फायनॅन्शियल एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की “अमेरिकेने हे वृत्त (असीम मुनीर यांना आर्मी डे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केल्याचं वृत्त) खोटं असल्याचं स्पष्ट केलं आहे. व्हाइट हाऊसने म्हटलंय, “आम्ही कोणत्याही परदेशी लष्करी नेत्यांना अशा प्रकारचं निमंत्रण दिलेलं नाही”.
व्हाइट हाऊसची दक्षिण आशियातील माध्यमांवर नाराजी
दक्षिण आशियातील अनेक प्रसारमाध्यमांनी दावा केला होता अमेरिकेने आर्मी डे परेडसाठी असीम मुनीर यांना निमंत्रण पाठवलं आहे. हे अधिकृत वृत्त असल्याचं देखील या माध्यमांनी म्हटलं होतं. मात्र आता व्हाइट हाउसने हे वृत्त फेटाळलं आहे. तसेच हा राजनैतिक हलगर्जीपणा असल्याचं देखील नमूद केलं आहे.
त्या सर्व बातम्या खोट्या आहेत : व्हाइट हाऊस
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे १४ जून रोजी ‘आर्मी डे’परेड होणार आहे. तसेच एका मोठ्या सोहळ्याचंही आयोजन करण्यात आलं आहे. यंदा या कार्यक्रमाचे २५० वे वर्ष असल्याने त्याला खास महत्त्व प्राप्त झालं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे. या कार्यक्रमाला मुनीर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आल्याचा दावा केला जात होता. पाकिस्तानचे लष्करप्रमुख गुरुवारीच (१३ जून) अमेरिकेत दाखल होतील असंही सांगण्यात आलं होतं. तसेच अमेरिका पाकिस्तानकडे त्यांच्या देशातील दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचा आग्रह धरेल, असंही म्हटलं जात होतं. मात्र, या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचं व्हाइट हाऊसने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, अमेरिकेने आर्मी डे परेडकरिता असीम मुनीर यांना आमंत्रित करण्यामागील अमेरिकेचा हेतू काय? अमेरिकेची रणनिती काय? यावर बरीच चर्चा रंगू लागली होती.