Who is G Ranganathan Sresan Pharma Owner : मध्य प्रदेश, राजस्थानसह देशातील अनेक ठिकाणी ‘कोल्ड्रिफ’ या कफ सिरपमुळे (खोकल्यावरील औषध) अनेक लहान मुलं दगावली आहेत. या कफ सिरपवर आता सरकारने कारवाई केली आहे. तसेच हे औषध बनवणारी कंपनी श्रेसन फार्मास्युटिकल्सचे मालक जी. रंगनाथन यांना अटक करण्यात आली आहे. या औषधामध्ये विषारी रसायन आढळल्याचा आरोप आहे. त्यानंतर मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश व तमिळनाडूत या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
दुसऱ्या बाजूला, मध्य प्रदेश पोलिसांनी जी. रंगनाथन यांना लहान मुलांच्या मृत्यूच्या प्रकरणात चेन्नई येथून अटक केली आहे. त्यांना पकडण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांची दोन पथकं तमिळनाडूमधील चेन्नई व कांचीपूरम येथे पाठवण्यात आली होती. कांचीपूरमला गेलेल्या पोलिसांनी श्रेसन कंपनीच्या कारखान्यातून औषधांचे काही नमुने घेतले आहेत, तर चेन्नईला गेलेल्या पथकाने रंगनाथन यांना बेड्या ठोकल्या.
सदोष मनुष्यवधाच्या (जो खुनाच्या श्रेणीत येत नाही) गुन्ह्यासह, मुलांच्या सुरक्षेला धोका आणि औषधांमध्ये भेसळ करण्याच्या आरोपांखाली जी. रंगनाथन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्यांना आता मध्य प्रदेशमधील छिंदवाडा येथे घेऊन येणार आहेत. त्यासाठी त्यांनी चेन्नईतील न्यायालयात रंगनाथन यांनी ट्रान्झिट रिमांड मागितली आहे.
रंगनाथन यांना पकडून देणाऱ्यासाठी २० हजार रुपयांचं बक्षीस
मध्य प्रदेश पोलिसांनी जी. रंगनाथन कुठे आहेत याची माहिती देणाऱ्यांना, त्यांना अटकेसाठी मदत करणाऱ्यास २० हजार रुपयांचं बक्षीश जाहीर केलं होतं. मध्य प्रदेश पोलीस ५ ऑक्टोबर रोजी रंगनाथन यांना पकडण्यासाठी तमिळनाडूला गेले होते. मात्र, रंगनाथन यांच्या हाती लागत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या नावे बक्षीस जाहीर केलं होतं.
जी. रंगनाथन (७५) हे चेन्नईस्थित फार्मास्टुटिकल उद्योगपती असून श्रेसन फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर कंपनीचे मालक आहेत. याच कंपनीने वादग्रस्त कॉल्ड्रिफ कफ सिरप तयार केलं आहे. त्यांनी मद्रास वैद्यकीय महाविद्यालयातून फार्मसीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांच्या कंपनीला सुरुवातीच्या काळात Pronit नावाच्या न्युट्रिशनल सिरपसाठी ओळख मिळाली होती, जे चेन्नईत गरोदर महिलांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. रंगनाथ स्वतः हे औषध विकलं जावं यासाठी डॉक्टरांच्या भेटी घ्यायचे, त्यांना औषधाच्या फायद्यांची माहिती द्यायचे.