आजचे गुगल डुडल अगदी खास आहे. भारताच्या पहिल्या महिला वैमानिक सरला ठकराल यांच्या जयंतीनिमित्ताने गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली आहे. वर्षानुवर्षे चालत आलेली सगळी बंधन झुगारून देऊन अक्षरशः अवकाशात भरारी घेऊन भारतीय महिलांसाठी आदर्श ठरलेल्या सरला ठकराल यांची आज (८ ऑगस्ट) १०७ वी जयंती आहे. सरला ठकराल यांनी तब्बल ८५ वर्षांपूर्वी जिप्सी मॉथ नावाच्या विमानाचे उड्डाण करून देशाची पहिली महिला वैमानिक होण्याचा मान मिळवला होता. गुगलकडून ठकराल यांच्या या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुगलने आपल्या या डुडलबद्दल सांगताना म्हटले आहे, “आम्ही खरंतर गेल्या वर्षीच भारतात सरला ठकराल यांच्या सन्मानार्थ हे डूडल बनविण्याची योजना आखली होती. परंतु, केरळमध्ये झालेल्या दुःखद विमान दुर्घटनेनंतर आणि त्यासाठी सुरु असलेल्या मदतकार्यानंतर आम्ही हे डूडल थांबवलं. आम्ही सहसा एकापेक्षा जास्त वेळा डूडल करत नाही. परंतु, ठकराल यांनी विमान उड्डाणाचं स्वप्नं पाहणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी कायमस्वरूपी ठेवलेला हा वारसा इतका प्रेरणादायी आहे कि, यंदा आम्ही ठकराल यांच्या सन्मानार्थ त्यांच्या १०७ व्या वाढदिवसानिमित्त हे डूडल बनविण्याचा निर्णय घेतला.”

१९३६ साली दाखवून दिलं “आकाश आता फक्त पुरुषांसाठी नाही”

सरला ठकराल यांचा जन्म ८ ऑगस्ट १९१४ साली दिल्ली येथे झाला. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचा विवाह वैमानिक असलेल्या पीडी शर्मा यांच्या सोबत झाला. आपल्या पायलट पतीपासून प्रेरणा घेऊन आणि आपल्या ईच्छाशक्तीच्या बळावर सरला ठकराल यांनी त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवलं. जोधपूर फ्लाईंग क्लबमध्ये प्रशिक्षण सुरु केले. वयाच्या २१ व्या वर्षी साडी परिधान करून त्यांनी आपल्या पहिल्या एकल उड्डाणासाठी लहान दोन पंखांच्या विमानाच्या कॉकपिटमध्ये पहिले पाऊल ठेवले. १९३६ साली सरला ठकराल यांनी लाहोर येथे जिप्सी मॉथ नावाच्या २ सीटर विमानाचे यशस्वी उड्डाण केले आणि लगेच वर्तमानपत्रांमध्ये संदेश झळकला, “आकाश आता फक्त पुरुषांसाठी नाही.”

‘A’ कॅटेगरीमधील लायसन्स मिळवणारी पहिली भारतीय महिला

सरला ठकराल यांनी सुरुवातीला प्रशिक्षण घेतल्यानंतर १,००० तासांचे विमान उड्डाण करुन ‘A’ कॅटेगरीमधील लायसन्स मिळवण्यात यश मिळवलं. ही कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. सरला ठकराल यांच्या पतीचा एका विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. ठकराल यांनी व्यावसायिक पायलट बनण्याची तयारी सुरू केली होती. परंतु, १९३९ साली दुसरे जागतिक महायुद्ध सुरु झाले. त्यामुळे, आपले हे स्वप्न त्यांना मागे ठेवावे लागले. मग पुढे सरला ठकराल यांनी लाहोरच्या मेयो स्कूल ऑफ आर्ट्स (आता नॅशनल कॉलेज ऑफ आर्ट्स) मध्ये ललित कला आणि चित्रककलेचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्या दिल्लीला परतल्या आणि चित्रकला सुरू ठेवली. पुढे त्यांनी दागिन्यांच्या डिझाईनमध्ये करिअर केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is indian woman featured on google doodle today
First published on: 08-08-2021 at 12:55 IST