Indian American Lawyer Neil Katyal Donald Trump Tariff Case: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी “देशाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या प्रकरणांपैकी एक” म्हणून वर्णन केलेल्या खटल्याचा युक्तिवाद करण्यासाठी भारतीय वंशाचे अमेरिकन वकील नील कात्याल बुधवारी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात हजर राहणार आहेत.

१९७७ च्या आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायद्याअंतर्गत टॅरिफ लादण्याचा अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आहे की अमेरिकन काँग्रेसला, हे या खटल्यात ठरवले जाईल.

५४ वर्षीय भारतीय वंशाचे नील कात्याल हे याचिकाकर्त्यांचे प्रमुख वकील आहेत. नील कात्याल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफ लादण्याचा अधिकार नसून, तो अमेरिकन काँग्रेसला आहे, असा युक्तिवाद करतील.

देवाला प्रार्थना करा की…

“माझ्या मते, हा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या सर्वात महत्त्वाच्या आणि परिणामकारक निर्णयांपैकी एक असेल. जर आपण जिंकलो तर आपण जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात सुरक्षित देश असू. जर आपण हरलो तर आपला देश जवळजवळ तिसऱ्या जगातील देशांच्या दर्जापर्यंत घसरू शकतो. त्यामुळे देवाला प्रार्थना करा की असे होऊ नये!”, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये म्हटले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ते स्वतः या सुनावणीला उपस्थित राहणार असल्याचे घोषित केले होते, परंतु नंतर त्यांनी हा निर्णय रद्द केला.

कोण आहेत नील कात्याल?

नील कात्याल हे अमेरिकन कायदा वर्तुळातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात ५० हून अधिक खटले लढवले आहेत. २००० मध्ये बुश विरुद्ध गोर खटल्यात उपराष्ट्रपती अल गोर यांचे सह-सल्लागार म्हणून त्यांनी काम केले होते. तेव्हा ते राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदा चर्चेत आले होते.

“ट्रम्प टॉरमेंटॉर” म्हणून ओळख

गेल्या काही वर्षांत नील कात्याल यांनी ट्रम्प प्रशासनाने सुरू केलेल्या धोरणांना वारंवार आव्हान दिले आहे. म्हणून अमेरिकेत त्यांना “ट्रम्प टॉरमेंटॉर” म्हणून ओळखले जाते.

नील कात्याल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांच्या अमेरिकेत प्रवेशबंदीविरोधात आणि त्यांच्या हद्दपारीविरोधात अमेरिकन सरकारच्या निर्णयाला आव्हान दिले होते.

कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी

शिकागोमध्ये भारतीय स्थलांतरित पालकांच्या पोटी जन्मलेल्या नील कात्याल यांच्या आई प्रतिभा या डॉक्टर आहेत, तर वडील अभियंता होते. नील कात्याल यांनी येल लॉ स्कूलमधून पदवी प्राप्त केली आहे. तत्पूर्वी कात्याल यांनी इलिनॉयमधील विल्मेट येथील जेसुइट कॅथोलिक हायस्कूल लोयोला अकादमीमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले होते.