Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत जोरदार प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील तब्बल ९ ठिकाणी असलेल्या दहशतवादी तळांना भारताने उद्ध्वस्त करत मोठी कारवाई केली. भारताने केलेल्या या कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती सांगण्यात आली. दरम्यान, आता भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

भारत ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदेश जगात पोहोचवणार आहे. यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करण्यात आलं असून या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचं नेतृत्व शशी थरूर, सुप्रिया सुळे यांच्यासह आदी नेते करणार आहेत. या शिष्टमंडळात सर्वपक्षीय खासदारांचा सहभाग असणार आहे. हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशांत जाऊन भारताची भूमिका मांडणार आहेत. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या ७ सदस्यांच्या संसदीय शिष्टमंडळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्यावर देखील महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत भारताची भूमिका जगभरात मांडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करण्यासाठी काँग्रेसला संपर्क साधला तेव्हा काँग्रेसकडून चार खासदारांची नावे सरकारला सुचवण्यात आले. मात्र, या नावांमध्ये शशी थरूर यांचं नाव नव्हतं. काँग्रेसने शशी थरूर यांचं नाव या यादीमधून वगळल्यानंतरही केंद्र सरकारकडून शशी थरूर यांचंच नाव शिष्टमंडळात घेण्यात आलं. त्यामुळे उलटसुलट चर्चांनी जोर धरला आहे.

जयराम रमेश काय म्हणाले होते?

सर्वपक्षीय शिष्टमंडळात काँग्रेसच्या प्रतिनिधीबाबत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितलं होतं की, “संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी या बाबत चर्चा केली आहे. काँग्रेसला शिष्टमंडळांसाठी चार खासदारांची नावे सादर करण्यास सांगण्यात आले. विरोधी पक्षनेत्याने औपचारिकपणे नावे सादर केली आहेत. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, खासदार गौरव गोगोई, खासदार डॉ. सय्यद नसीर हुसेन, खासदार राजा ब्रार यांच्या नावांचा समावेश होता.

काँग्रेसने शशी थरूर यांचं नाव का नाकारलं?

‘ऑपरेशन सिंदूर’बाबत भारताची भूमिका जगभरात मांडण्यासाठी केंद्र सरकारने शशी थरूर यांची निवड केली. मात्र, शशी थरूर यांचं नाव काँग्रेसने वगळलं. शशी थरूर यांच्या ऐवजी काँग्रेसने दुसरी चार नावे सादर केले होते. पण तरीही केंद्र सरकारने शशी थरूर यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केल्याने चर्चा रंगल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून शशी थरूर हे मोदी सरकारचं कौतुक करत असल्याचं पाहायला मिळत आहे.काही दिवसांपूर्वी शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचं कौतुक केलं होतं. एवढंच नाही तर शशी थरूर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका मंचावर आल्याचंही पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता केंद्र सरकारकडून शशी थरूर यांचं नाव शिष्टमंडळात घेण्यात आल्यामुळे उलटसुलट चर्चांनी जोर धरला आहे.

शिष्टमंडळाची जबाबदारी कोणत्या नेत्यांवर असणार?

शशी थरूर (काँग्रेस)
रविशंकर प्रसाद (भाजपा)
संजय कुमार झा (जेडीयू)
बैजयंत पांडा (भाजपा)
कनिमोझी करुणानिधी (डीएमके)
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी एसपी)
श्रीकांत एकनाथ शिंदे (शिवसेना, शिंदे)

शशी थरूर यांनी काय प्रतिक्रिया दिली?

“अलिकडच्या घटनांबद्दल आपल्या देशाचा दृष्टिकोन मांडण्यासाठी पाच प्रमुख देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी भारत सरकारने मला आमंत्रित केल्याबद्दल मला सन्मान वाटतो. जेव्हा राष्ट्रीय हिताचा प्रश्न येतो आणि माझ्या मदतीची आवश्यकता असते, तेव्हा मी मागे राहणार नाही”, असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे.