पश्चिम बंगालमधील भाजपा नेत्या अग्निमित्रा पॉल यांनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले आहे. बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना वाराणसी येथून निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला होता, अशी माहिती तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनी इंडिया टुडेला दिली होती. ही माहिती बाहेर आल्यानंतर भाजपeच्या नेत्या अग्निमित्रा यांनी बॅनर्जी यांना हे आव्हान दिले.

“जागावाटपाची चर्चा होण्याआधी ममता बॅनर्जी यांनी प्रियांका गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी येथून निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला. पण ममता बॅनर्जी यांनी स्वतः हे धाडस दाखवावे. तुम्हाला पंतप्रधान व्हायचे आहे. मग तुम्हीच पंतप्रधानांच्या विरोधात निवडणूक लढवावी. यातून तुमच्यात किती हिंमत आहे, हेही दिसून येईल”, असे आव्हान अग्निमित्रा यांनी दिले आहे.

हे वाचा >> “पंतप्रधानपदाचा उमेदवार आताच जाहीर करू नये,” इंडिया आघाडीच्या बैठकीआधी ममता बॅनर्जींची भूमिका!

२०१९ साली झालेल्या निवडणुकीतही प्रियांका गांधी वाराणसी येथून पंतप्रधान मोदींच्या विरोधात निवडणूक लढवतील अशी जोरदार चर्चा होती. मात्र ऐनवेळी काँग्रेसचे नेते अजय राय यांना या मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली.

अग्निमित्र पॉल यांनी यावेळी इंडिया आघाडीमधील नेत्यांमधील राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील विसंगती लक्षात आणून दिली. त्या म्हणाल्या, पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे नेते अंधीर रंजन चौधरी हे तृणमूल काँग्रेसवर कार्यकर्त्यांच्या हत्या केल्याचा आरोप केला होता. राज्याच्या स्थानिक निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या होत्या. दरम्यान ममता बॅनर्जी सोनिया गांधी यांच्यासमवेत दिल्लीत एकाच मंचावर येतात आणि आपापसात चांगली मैत्री असल्याचे दाखवून देतात. तृणमूल काँग्रेसशी हातमिळवणी करून लोकसभेच्या निवडणुका लढविताना अधीर रंजन चौधरी पीडिता कुटुंबियांना काय तोंड दाखविणार आहेत? असा प्रश्न अग्निमित्रा यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा >> ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदासाठी खरगेंचं नाव घेतलं नाही; काँग्रेस नेत्याने खुलासा करताना म्हटले, “दलित पंतप्रधान..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंडिया आघाडीची चौथी बैठक झाल्यानंतर जेव्हा ममता बॅनर्जी यांना प्रियांका गांधी यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्या म्हणाल्या की, बैठकीत काय चर्चा झाली, हे आम्ही आताच सर्व सांगू शकत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीच्या बैठकीत ३१ डिसेंबर पूर्वी जागावाटपाचे सूत्र निश्चित करावे, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे.