प्रत्येक मुलीचे स्वप्न असते की तिचे लग्न झाल्यावर सुखी संसार असावा, मुले असावीत. पण नियतीपुढे कधी कधी आपली स्वप्न मागे पडतात. असेच काहीसे एका महिलेसोबत झाले. विवाहानंतर सुखी संसाराची स्वप्न पाहणा-या या महिलेच्या पतीचा अचानक मृत्यू झाल्याने तिच्या स्वप्नांची होळी झाली.
दिल्लीत राहणा-या एका तरुण महिलेचे काही वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर कुटुंब विस्ताराचे या महिलेने स्वप्न पाहिले होते. मात्र, तिच्या पतीचा अचानक दिल्लीतील एका रुग्णालयात मृत्यू झाला. आपल्या पतीपासूनचं आपल्याला मुलं व्हावे अशी इच्छा बाळगणा-या या महिलेने रुग्णालयातील डॉक्टरांकडून मृत पतीच्या शुक्राणूंची (स्पर्म) मागणी केली. यासाठी तिच्या कुटुंबानेही तिला पाठिंबा दिला होता. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत पतीचे शुक्राणू देण्यास नकार दिला. भारतात मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करून शुक्राणू मिळवण्याबाबत अद्याप कोणताही कायदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी सदर महिलेस तिच्या मृत पतीचे शुक्राणू देण्यास नकार दिला. ‘एम्स’चे न्यायवैद्यक विज्ञान प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले की, मृत व्यक्तीच्या शरीरातून स्पर्म मिळवणे खूप सोपे आहे. केवळ पाच मिनिटांत हे होऊ शकते. पण याविषयी काही नैतिक आणि कायदेशीर अडचणी आहेत त्यामुळे असे न करण्यास आम्ही बांधिल आहोत.
इस्राइलमध्ये मृत पतीच्या शवातून शुक्राणू प्राप्त करण्याविषयी अधिकृत कायदा आहे. याअंतर्गत विधवा महिला मिळालेल्या शुक्राणूद्वारे वर्षाभराच्या आत गर्भधारणा करु शकते. पण जर पत्नी मृत पावली तर स्पर्मचा दुसरी व्यक्ती वापर करू शकत नाही.