पीटीआय, नवी दिल्ली : ‘‘देशातील ११२ जिल्ह्यांमध्ये परिवर्तन घडवून आणणारा महत्त्वाकांक्षी जिल्हास्तरीय गट उपक्रम (इन्स्पिरेशनल ब्लॉक प्रोग्रॅम) प्रेरक गटांच्या उत्कर्षांचा पाया बनेल. या योजनेच्या यशाचा आढावा घेण्यासाठी आपण पुढील वर्षी परत येऊ,’’ अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिली. या उपक्रमामुळे ११२ जिल्ह्यांतील २५ कोटींहून अधिक नागरिकांच्या जीवनात परिवर्तन झाल्याचा दावाही त्यांनी केला. या योजनेच्या अंमलबजावणीशी संबंधित ‘संकल्प सप्ताहा’च्या प्रारंभ सोहळय़ात मोदी बोलत होते. यावेळी मोदी म्हणाले, की आकांक्षी जिल्हा कार्यक्रम स्वतंत्र भारतातील अग्रगण्य दहा उपक्रमांच्या यादीत सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. हे प्रेरक जिल्हे आता इतरांसाठी प्रेरणादायक जिल्हे बनले आहेत. यानुसार पुढील वर्षांपर्यंत पाचशे गटांपैकी किमान १०० प्रेरणादायक गट निर्माण होतील. मोदींनी यावेळी विविध मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांना १०० गट निवडून विविध निकषांनुसार त्यांची राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त कामगिरी घडवून आणण्याची सूचना केली. मोदी म्हणाले, की मला विश्वास वाटत आहे, की २०२४ मध्ये आम्ही ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुन्हा भेटू आणि या उपक्रमाच्या यशाचा आढावा घेऊन मूल्यांकन करू. या संदर्भात पुढच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मी तुमच्याशी पुन्हा संवाद साधेन. मोदींनी या संदर्भातील एका संकेतस्थळाचा प्रारंभ आणि एका प्रदर्शनाचे उद्घाटन केले. माझ्याइतकी प्रदीर्घ काळ सरकार चालवण्याची संधी फार कमी जणांना मिळते, असे सांगून मोदी म्हणाले, की मी अनुभवावरून सांगतो की केवळ अर्थसंकल्प बदल घडवत नाही, जर आपण उपलब्ध संसाधनांचा नियोजनपूर्वक विनियोग आणि अभिसरण केले, तर जिल्हास्तरीय गटांसाठी कोणत्याही नवीन निधीशिवायही काम होऊ शकते. यावेळी त्यांनी संसाधनांच्या न्याय्य वितरणावर भर आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन केले. सप्ताहात विविध उपक्रम या सोहळय़ात देशाच्या विविध भागांतील सुमारे तीन हजार ग्रामपंचायती आणि गटांतील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी, तसेच सरकारी अधिकारी प्रत्यक्ष सहभागी झाले होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात गट आणि ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी, शेतकरी आणि स्थानिकांसह सुमारे दोन लाख नागरिक सहभागी झाल्याचे समजते. या संदर्भातील निवेदनानुसार, ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान चालणाऱ्या या ‘संकल्प सप्ताहा’चा प्रत्येक दिवस एका विशिष्ट विकास संकल्पनेला समर्पित आहे. ज्यावर सर्व आकांक्षी गट काम करतील. पहिल्या सहा दिवसांत अनुक्रमे ‘पूर्ण आरोग्य’, ‘पोषित कुटुंब’, ‘स्वच्छता’, ‘शेती’, ‘शिक्षण’ आणि ‘समृद्धी दिवस’ हे विषय आहेत.