पोटदुखी आणि मानेत दीर्घकाळ असणाऱ्या दुखण्यावर उपचार करून घेण्यासाठी मुनूस्वामी नावाच्या स्वयंघोषित बाबाच्या आश्रमात राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या तिरूवल्लूर जिल्ह्यातील पूंडी भागात हा आश्रम आहे. गेल्या वर्षभरापासून ही तरुणी या आश्रमात राहात होती. मात्र, मंगळवारी सकाळी तिला अचानक उलट्या होऊ लागल्यानंतर हा प्रकार समोर आला. रुग्णालयात उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आलं आहे. या घटनेमुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

बाबानं हट्टानं तरुणीला आश्रमात ठेवून घेतलं

वेल्लथुकोट्टई परिसरात हा आश्रम असून गेल्या वर्षभरापासून ही तरुणी याच आश्रमात राहात होती. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार बीएससीचं शिक्षण घेणाऱ्या या तरुणीला तिच्या पालकांनी उपचारांसाठी आश्रमात ठेवलं होतं. मुनुस्वामी आश्रमात वेगवेगळ्या पूजा आणि हर्बल वनस्पतींच्या मदतीने उपचार करत असल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे, करोना काळात ऑनलाईन वर्ग सुरू झाल्यानंतर देखील मुनुस्वामी बाबानी या तरुणीला घरी न पाठवता तिथेच ठेवून घेतलं.

लग्न जुळत नसल्याने तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून घेतलं; जाळून घेताच शेतातील गंजीही पेटली अन् होरपळून मृत्यू

मंगळवारी सकाळी ही तरुणी उलट्या करू लागल्यानंतर आधी बाबानी तिच्यावर आश्रमातलेच उपचार केले. त्यानंतर देखील फरक न पडल्याने काही तासांनंतर तिला रुग्णालयात नेण्यासाठी रिक्षा बोलावण्यात आली. रुग्णालयात उपचारांदरम्यान तरुणीचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं. तरुणीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र, या तरुणीने जंतूनाशक औषध प्यायल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

मुलीमध्ये दोशम असल्याचं सांगितलं!

दरम्यान, मुनूस्वामीनं संबंधित तरुणीच्या पालकांना तिच्यामध्ये ‘दोशम’ असल्याचं सांगितलं होतं. आकाशात चंद्र नसताना आणि आकाशात पूर्ण चंद्र असताना विशिष्ट पूजा करणं आवश्यक आहे, असं देखील सांगितलं होतं. अनेकदा तिला रात्रीच्या वेळी होणाऱ्या पूजाविधीमध्ये देखील मुनुस्वामी बाबा सहभागी करून घेत असे. अशा प्रकारे इतरही अनेक लोक, विशेषत: महिला मुनुस्वामी बाबाकडे रात्रीच्या वेळी पूजेसाठी थांबत असल्याची माहिती समोर आली आहे.