पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या सभा

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचार सभांचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून रणरणत्या उन्हात नेत्यांच्या सभांना गर्दी जमविण्याचे आव्हान पेलताना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, धनंजय मुंडे, नवाब मलिक आदी अनेक दिग्गज नेते प्रचारार्थ दाखल होणार असल्याने त्यांच्यासाठी टळटळीत उन्हात गर्दी जमविण्यासाठी कार्यकर्त्यांसमोर आव्हान आहे. उन्ह टाळण्यासाठी सभांची वेळ सायंकाळी ठेवण्याचा प्रयत्न होत आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करतानाच वरिष्ठ नेत्यांना पाचारण करून प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर नेत्यांचा मोर्चा नाशिकसह उत्तर महाराष्ट्राकडे वळणार आहे. नाशिकमध्ये चौथ्या टप्प्यात मतदान असल्याने १८ ते २५ एप्रिल या कालावधीत प्रचार सभांचा एकच धडाका उडण्याच्या मार्गावर आहे. या निमित्ताने राजकारणातील अनोख्या छटांचे दर्शन घडू लागेल. जाहीर सभा गाजविणारे राज्यासह देशातील दिग्गज नेते प्रचाराच्या निमित्ताने नाशकात दाखल होणार असून त्या अनुषंगाने नियोजनाला सर्वपक्षीय यंत्रणा कामास लागली आहे.

दुष्काळ, पाणी टंचाईच्या संकटामुळे ग्रामीण भागात प्रचारात उत्साह दिसत नाही. या भागात नेहमीच्या उत्साहात प्रचार करणेही अवघड. शहरी भागात भेटीगाठी घेऊन उमेदवार, पक्षीय कार्यकर्ते प्रचारात गुंतले असले तरी खरा रंग चढतो तो फड गाजविणाऱ्या जाहीर सभांनी. नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

माघारीची मुदत संपुष्टात आल्यानंतर मतदारसंघनिहाय अंतिम चित्रही स्पष्ट झाले आहे. तत्पूर्वीच, प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. दिंडोरीतील माकप उमेदवारासाठी ज्येष्ठ नेते सीताराम येच्युरी यांनी चांदवड येथे सभा घेतली. लगोलग राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सय्यद पिंप्री येथे सभा झाली. नाशिकचा पारा ४० अंशावर धडकला आहे. सकाळी १०पासून तळपत्या उन्हाचे चटके बसतात. सायंकाळी पाच ते सहापर्यंत वातावरण तसेच असते. या काळात सभेसाठी गर्दी जमत नसल्याचे राजकीय पक्षांना लक्षात आले आहे. यामुळे सभांचे नियोजन करतानाच सकाळी अथवा सायंकाळी उशिरा असा विचार होत आहे.  सेना-भाजप महायुतीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव अथवा ओझर येथे सभा होणार आहे. या सभेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. २४ एप्रिल रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सभा होणार आहे. युवा सेनेचे प्रमुख आदित्य यांचीही सभा होईल. तसेच नितीन गडकरी, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांच्या सभांचे नियोजन होण्याची शक्यता आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे, नवाब मलिक यांसह इतर नेत्यांना सभांच्या मैदानात उतरविणार आहे. काँग्रेसच्या वतीने धुळे मतदारसंघास जोडलेल्या नाशिक जिल्ह्य़ातील भागात प्रियंका गांधी यांची सभा घ्यावी, याकरिता पाठपुरावा करत आहे. तसेच अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे नेते प्रचारात सहभागी होतील, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

गर्दीचा उच्चांक कोण मोडणार?

प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या नेत्यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्याचा प्रयत्न आहे. काहींच्या सभा निश्चित असून काहींच्या अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. या नेत्यांच्या सभांना कशी गर्दी होईल, गर्दीचा उच्चांक कोण मोडेल, याविषयी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील हुतात्मा अनंत कान्हेरे हे सभेच्या प्रचारासाठीचे महत्त्वाचे मैदान. सुमारे एक लाखाची क्षमता असणाऱ्या या मैदानावरील जाहीर सभांकडे सर्वाचे लक्ष असते. टळटळीत उन्हाळ्याच्या दिवसात गर्दी जमविणे मोठे आव्हान आहे. मोदी यांच्या सभेसाठी नाशिक, दिंडोरी आणि धुळे मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून पिंपळगाव किंवा ओझर यापैकी एका मध्यवर्ती भागाची निवड केली जाईल. राज यांच्या सभेच्या काही तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यात नाशिकचा समावेश नाही. ते नाशिकमध्ये सभा घेतील की नाही, याची स्पष्टता झालेली नाही. तशीच स्थिती प्रियंका गांधी यांच्या सभेची आहे.