करोनाचा कहर, जगभरात मृतांची संख्या अडीच लाख

करोनाचा फटका सर्वाधिक अमेरिकेला बसला आहे.

अमेरिकन बायोटेक्नोलॉजी कंपनी नोव्हाव्हॅक्सने ऑस्ट्रेलियात या लसीच्या मानवी चाचण्या सुरु झाल्याची घोषणा केली आहे.

जगात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात ३६ लाख ४७ हजार ६२३ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी दोन लाख ५२ हजार ४४४ जणांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत ११ लाख ९३ हजार जणांनी करोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासांत ७८ हजार ३७७ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. तर तीन हजार ८७७ जणांचा मृत्यू झाला.

जगभरात करोनाचा फटका सर्वाधिक अमेरिकेला बसला आहे. आतापर्यंत जगातील रूग्णांपैकी एक तृतियांश रुग्ण अमेरिकेतील आहेत. तर जगातील एकूण मृत्यूपैकी एक चतुर्थांश मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत आतापर्यंत १२ लाख १२ हजार ९५५ जणांना संसर्ग झाला आहे तर ६९ हजार ९२५ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. स्पेनमध्ये २५ हजार ४२८ जणांचा मृत्यू झाला तर दोन लाख ४८ हजार ३०१ जणांना संसर्ग झाला आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत जवळपास ३० हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

सिंगापूरमध्ये ४८०० भारतीयांना संसर्ग

सिंगापूरमध्ये वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांपैकी  ४८०० भारतीयांना करोनाचा संसर्ग झाला असून त्यांची लक्षणे मात्र सौम्य आहेत असे तेथील भारतीय उच्चायुक्तांनी म्हटले आहे.  सिंगापूरचे आरोग्य मंत्री गॅम किम योंग यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात ५७३ नवीन रुग्ण सापडले आहेत. एप्रिल अखेर सिंगापूरमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढले असून त्यात भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. सिंगापूरमध्ये एकूण करोना रुग्णांची संख्या १८७७८ आहे.

भारतात २४ तासांत १९५ बळी, ३ हजार ९०० नवीन रूग्ण

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात अद्यापही वाढतच आहे. मागील चोवीस तासांत देशात करोनाने 195 जणांचा बळी घेतला असून तब्बल 3 हजार 900 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची रुग्ण संख्येतील ही सर्वाधिक वाढ नोंदवल्या गेली आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 46 हजार 433 वर पोहचली आहे. यामध्ये 32 हजार 134 जणांवार सध्या उपचार सुरू आहेत. तर 12 हजार 727 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर आतापर्यंत मृत्यू झालेल्या 1 हजार 568 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

जपानमधील आणीबाणीची मुदत मेअखेपर्यंत वाढवली

जपानमध्ये करोनाचा प्रसार रोखण्याासठी लागू करण्यात आलेली आणीबाणी मे अखेपर्यंत वाढवण्यात आल्याचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांनी सांगितले. विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने ७ एप्रिल रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती, त्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: World coronavirus death toll exceeds 250000 nck

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या