Yogi Adityanath’s Reaction On I Love Muhammad: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात मौलवी तौकीर रझा खान यांच्यावर टीका करताना म्हटले की, राज्यात सत्ता कोणाकडे आहे हे ते विसरले आहेत. इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिलचे प्रमुख रझा खान यांनी “आय लव्ह मुहम्मद” मोहिमेचे आवाहन केले होते, ज्याला हिंसक वळण लागले. या हिंसक संघर्षांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

“काल, एका मौलवी राज्यात सत्ता कोणा आहे हे विसरले. त्यांना वाटले की, ते जेव्हा वाटेल तेव्हा व्यवस्था थांबवू शकतात, परंतु आम्ही रस्त्यावर अडथळा किंवा कर्फ्यू लागणार नाही याची व्यवस्था केली आहे. आम्ही शिकवलेला धडा भविष्यातील पिढ्यांना दंगल करण्यापूर्वी दोनदा विचार करायला लावेल”, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

योगी आदित्यनाथ यांनी यावेळी नमूद केले की, २०१७ नंतर उत्तर प्रदेशात एकदाही कर्फ्यू लागलेला नाही. “उत्तर प्रदेशच्या विकासाची गोष्ट तिथूनच सुरू झाली आहे”, असे त्यांनी जोर देऊन सांगितले.

शुक्रवारच्या नमाजानंतर उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये पोलीस आणि “आय लव्ह मुहम्मद” पोस्टर घेऊन आलेल्या आंदोलकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे विधान केले आहे. अधिकाऱ्यांनी रझा खान यांना आंदोलन करण्याची परवानगी नाकारल्यानंतर आंदोलक संतप्त झाले होते.

उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक अजय कुमार साहनी म्हणाले की, “हा हिंसाचार पूर्वनियोजित कट असल्याचे दिसून येत आहे आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी गुन्हेगारांना शिक्षा दिली जाईल.” उत्तर प्रदेशच्या गुप्तचर विभागानेही एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, हा एक “पूर्वनियोजित कट” होता.

९ सप्टेंबर रोजी कानपूरमध्ये बरवाफत मिरवणुकीदरम्यान सार्वजनिक रस्त्यावर “आय लव्ह मुहम्मद” असे फलक लावण्यात आले होते. तेव्हापासून उत्तर प्रदेशात तणाव आहे. हिंदू संघटनांनी याला चिथावणी आणि नवीन ट्रेंड असल्याचे म्हणत विरोध केला होता.

रझा यांच्या नियोजित आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही, त्यांच्या घराबाहेर मोठा जमाव जमला आणि जमावाने पोलिसांवर दगडफेक केली.