Goa Crime गोव्यातील जंगलात एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या महिलेचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात बंगळुरुतल्या २२ वर्षीय माणसाला अटक केली आहे. गोव्यात ज्या महिलेचा मृतदेह सापडला ती मूळची बंगळुरुची होती. तिचा मृतदेह सोमवारी सकाळी गोव्यातील जंगलात आढळून आला.

पोलिसांनी या घटनेबाबत काय सांगितलं?

२२ वर्षांचा तरुण आणि हत्या झालेली तरुणी या दोघांचे प्रेमसंबंध होते. दोघंही गोव्याला फिरायला आले होते. मात्र तरुणीचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध आहेत या संशयावरुन या दोघांचा वाद झाला. त्या वादातच या तरुणाने त्याच्या प्रेयसीची हत्या केली. या प्रकरणी पोंडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे. श्वान पथकाचीही मदत घेतली गेली. तसंच फॉरेन्सिक टीमही या प्रकरणात कार्यरत आहे.

हत्या झालेली तरुणी मूळची बंगळुरुची होती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या तरुणीची हत्या झाली ती तरुणी बंगळुरुची होती. ती एका शाळेत नॉन टिचिंग स्टाफ म्हणून काम करत होती. तर आरोपी संजय केव्हिन हा नोकरी करत नाही अशीही माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संजय बंगळुरुतून निघाला आणि त्याच्या प्रेयसीला कर्नाटकातल्या हावेरी या ठिकाणी भेटला. या दोघांनी गोव्याला फिरायला जाऊ असं ठरवलं. त्यानंतर दोघंही हुबळीहून बसने गोव्याला गेले. तिथे या दोघांचा वाद झाला ज्यानंतर संजयने त्याच्या प्रेयसीची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय आणि त्याची प्रेयसी शाळेपासून मित्र -मैत्रीण होते. या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून संजयला त्याच्या प्रेयसीचं दुसऱ्या तरुणावर प्रेम आहे असा संशय होता. या संशयातूनच त्याने प्रेयसीची हत्या करण्याचा कट आखला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय सुरा घेऊनच प्रेयसीसह गोव्यात आला होता-पोलीस

संजयने प्रेयसीची हत्या करण्याच्या उद्देशाने बरोबर सुराही आणला होता. अशी माहिती पोलिसांनी दिली. तसंच पोलिसांनी सांगितलं दोघंही बसने हुबळीहून गोव्यात आले. त्यानंतर दोघंही धारबांदोरा भागात जिथे जंगल आहे तिथे फिरायला गेले. त्यानंतर संजयने त्याच्या प्रेयसीला झुडुपांमध्ये नेलं आणि तिच्या गळ्यावरुन सुरा फिरवत तिची हत्या केली. तिचा फोन त्याने आधीच हिसकावून घेतला होता. तिची हत्या करुन संजयने तिथून पळ काढला त्यानंतर तो टॅक्सीने हुबळीला गेला. या तरुणाला अटक करण्यात आली तेव्हा प्राथमिक चौकशीत त्याने सांगितलं की प्रेयसीला मारल्यावर मी कर्नाटकात येऊन आत्महत्या करणार होतो. पोलिसांना घटनास्थळी हुबळी ते गोव्याच्या तिकिटाचा तुकडा मिळाला. त्यानंतर पोलिसांनी बस स्टँडवर सीसीटीव्ही तपासला त्यात पोलिसांना ही तरुणी तिच्या प्रियकरासह आल्याचं समजलं. या मृत्यू प्रकरणाला गोवा पोलिसांनी ब्लाईंड मर्डर केस असं नाव दिलं होतं. मात्र हे प्रकरण घटना घडल्यापासून पोलिसांनी अवघ्या २४ तासांमध्ये सोडवलं. पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली माहिती दिली. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.