क्रिकेट सामन्यादरम्यान कॉमेंट्री करण्यासाठी माइक उचलताच विजेचा धक्का लागून एका २२ वर्षीय बीकॉमच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. किरण कुमार असे या मुलाचे नाव आहे. कर्नाटकमध्ये नीलमंगला जवळच्या धर्मानायकाना तांडयाजवळ रविवारी ही दुर्देवी घटना घडली. किरणचा मोठा भाऊ अरुण कुमार आणि कोट्टानहाल्ली गावातील अन्य खेळाडू मैदानावर उपस्थित असताना दुपारी १२.३० च्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.
किरण कुमार तुमाकुरु रस्त्यावरील एका खासगी कॉलेजमध्ये बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला होता. कोट्टानहाल्ली आणि आसपासच्या गावातील मुलांबरोबर किरण कुमार शनिवार-रविवारी क्रिकेट खेळायचा. रविवारी धर्मानायकाना तांडयाजवळ चार संघ क्रिकेट स्पर्धेसाठी जमले होते. सामन्याच्या ठिकाणी साऊंड सिस्टिमची व्यवस्था करण्यात आली होती.
विजेच्या एका खांबामधून बेकायदा वीज घेण्यात आली होती. किरण कुमारने कॉमेंट्री करण्यासाठी माइक उचलताच विजेच्या धक्क्याने खाली कोसळला. अरुण आणि अन्य खेळाडू त्याला लगेच जवळच्या रुग्णालायत घेऊन गेले. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले. चुकीच्या वायरींगमुळे विजेचा धक्का बसल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
नीलमंगला पोलिसांनी साऊंड सिस्टिम जप्त केली आहे. क्रिकेट स्पर्धेचे रीतसर आयोजन केले नव्हते. खेळाडूंच्या उपस्थितीनुसार त्यांनी त्याच ठिकाणी संघ तयार केले. किरण स्वत:च माइक आणि साऊंड सिस्टिम घेऊन आला होता असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.