एकीकडे देशात करोना अजूनही नियंत्रणात आलेला नसताना केरळमध्ये आता झिका विषाणू आढळून आला आहे. एका गर्भवती महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ही महिला ज्या रुग्णालयात उपचार घेत होती, तिथल्याच काही नर्स आणि डॉक्टरांचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवले असता ते देखील पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या २४ वर्षीय महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्याव खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या व्हायरसचा गर्भवती महिलांमधून त्यांच्या पोटातील बाळांना देखील संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांना अधिक काळजी घेण्यास सांगितलं जात आहे.

ताप, डोकेदुखी आणि अंगावर व्रण

ताप, डोकेदुखी आणि अंगावर व्रण उमटल्यामुळे तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या महिलेला दिसणाऱ्या लक्षणांमुळे तिची चाचणी करून नमुने तातडीने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ वायरोलॉजी अर्थात एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये झिका विषाणू असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, सदर महिलेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

अजून रुग्ण पॉझिटिव्ह आढळण्याची शक्यता

दरम्यान, सदर महिलेसोबतच तिरुअनंतपुरममधून एकूण १९ जणांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी १३ जणांना झिका व्हायरसची लागण झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, हा व्हायरस करोनाप्रमाणे जीवघेणा नसल्यामुळे पुरेशी काळजी घेतल्यास त्यावर मात करता येऊ शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यानुसार, डासांच्या चावण्यापासून स्वत:चा बचाव करणे आणि लागण झाल्यास पुरेसा आराम करणे आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

पदभार स्वीकारताच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा; करोनाविरोधात २३ हजार १२३ कोटींचं पॅकेज मंजूर!

झिका व्हायरसची लक्षणं डास चावल्यानंतर २ ते ७ दिवसांपर्यंत दिसू शकतात. सौम्य ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, उलटी अशी या विषाणूची काही लक्षणं आहेत.