Zohran Mamdani : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात लवकरच महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे. याआधी न्यू यॉर्कच्या महापौरपदाच्या डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये जोहरान ममदानी यांचा विजय झाला आहे. तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानी यांच्या विजयावर टीकीही केली होती.

आता हेच जोहरान ममदानी मागील काही दिवसांपासून कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत आहेत. आता जोहरान ममदानी हे पुन्हा एकदा एका वेगळ्या कारणांनी चर्चेत आले आहेत. जोहरान ममदानी यांचा एक फोटो व्हायरल होत असून त्या फोटोमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जोहरान ममदानी हे त्या फोटोमध्ये १९९३ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर बॉम्बस्फोटाच्या प्रकरणातील सह षड्यंत्रकारी असल्याचा आरोप असणाऱ्या इमाम सिराज वहाजबरोबर दिसत आहे.

या फोटोमध्ये जोहरान ममदानी दिसत असल्यामुळे महापौरपदाच्या निवडणूक प्रचाराच्या सहभागाबद्दलही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. समोर आलेल्या फोटोत जोहरान ममदानी आणि इमाम सिराज वहाज आणि युसूफ अब्दुस सलाम हे हसत असल्याचं दिसत आहे. तसेच इमाम सिराज वहाजच्या बेड-स्टुय मशिदीत शुक्रवारच्या नमाजादरम्यान काढण्यात आलेला हा फोटो असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

हा फोटो अमेरिकेच्या राजकारणात मोठं वादळ निर्माण करण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात जोहरान ममदानी हे ब्रुकलिनमधील मशिदीत शुक्रवारच्या नमाजला उपस्थित होते. यावेळी १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात सह-षड्यंत्रकारी असल्याचा आरोप असणाऱ्या इमाम सिराज वहाजबरोबर हातात हात घालून उभं राहून त्यांनी फोटो काढल्याचा आरोप आता केला जात आहे.

जोहरान ममदानी यांनी या संदर्भात एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामध्ये जोहरान ममदानी यांनी म्हटलं की, “आज मुस्लिम नेत्यांपैकी एक आणि बेड-स्टुय समुदायाचे इमाम सिराज वहाज यांची भेट झाली, त्यांना भेटून आनंद वाटला.”

दरम्यान, जोहरान ममदानी यांच्या या फोटोवर डोनाल्ड ट्रम्प आणि मस्क यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावर डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांनी तीव्र प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. ट्रम्प म्हणाले की, “ही कृती खूप लाजिरवाणी आहे. एक विशिष्ट माणूस त्याचं समर्थन करत आहे आणि त्याच्याशी खूप मैत्रीपूर्ण वागत असल्याच दिसत आहे हे लज्जास्पद आहे. तुम्हाला दिसेल की त्यांच्यात एक संबंध दिसून येत आहेत”, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी देखील या कृतीचा निधेष व्यक्त केला आहे. तसेच मस्क यांनी यावर प्रतिक्रिया देत ममदानी आणि वहाजच्या भेटीला फक्त ‘वाह’ अशी टिप्पणी केली आहे.

जोहरान ममदानी कोण आहेत?

-जोहरान ममदानी यांच्या आई-वडिलांचा जन्म भारतातील आहे. त्यांचे वडील महमूद ममदानी युगांडात शिक्षणतज्ज्ञ आहेत आणि आई मीरा नायर भारतीय चित्रपट निर्मात्या आहेत.

-जोहरान यांचा जन्म आणि संगोपन युगांडातील कंपाला येथे झाले आहे.

-ते सात वर्षांचे असताना आपल्या पालकांसह न्यू यॉर्कला स्थलांतरित झाले.

-२०१८ मध्ये त्यांना अमेरिकन नागरिकत्व मिळाले आणि त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला सीरियन कलाकार रामा दुवाजीशी लग्न केले.