Zohran Mamdani wins New York City elections : न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आणि भारतीय वंशाचे नागरिक जोहरान ममदानी (३४) यांनी विजय मिळवला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानी यांना उघड विरोध केला होता. त्यामुळे या निवडणुकीला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालं होतं. मात्र, ममदानी यांनी १.७२ लाख मतांनी विजय मिळवला आहे. ममदानी यांना ९,४८,२०२ मते (५०.६ टक्के) मिळाली आहेत. तर, अपक्ष उमेदवार अँड्रयू कुओमो यांना ७,७६,५४७ (४१.३ टक्के) आणि कर्टिस स्लिवा यांना १,३७,०३० इतकी मतं मिळाली आहेत.
दरम्यान, ममदानी यांनी त्यांच्या विजयी भाषणात नव्या पिढीसाठी लढण्याची प्रतिज्ञा केली. ते म्हणाले, “न्यू यॉर्कच्या नवीन पिढीचे आभार. आम्ही तुमच्यासाठी लढू. कारण तुम्ही आणि आम्ही एकच आहोत. न्यू यॉर्कचं भविष्य आपल्याबरोबर आहे. मित्रांनो आपण एकत्र येऊन एका मोठ्या राजकीय घराण्याला पराभूत केलं आहे.”
अँड्रयू कुओमोंबद्दल ममदानी काय म्हणाले?
जोहरान ममदानी यांनी यावेळी अँड्रयू कुओमो यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले, कदाचित मी त्यांचा हा शेवटचा उल्लेख करत आहे. यापुढे त्यांचा नामोल्लेख करण्याची कदाचित वेळ येणार नाही. कारण आपण त्यांचं राजकारण मागे टाकलं आहे. त्यांच्या राजकारणात काही विशिष्ट लोकांचं ऐकून घेतलं जात होतं.
ममदानींचा ट्रम्प यांना टोला
ममदानी यांनी त्यांच्या भाषणात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “डोनाल्ड ट्रम्प, माझ्याकडे तुमच्यासाठी केवळ चार शब्द आहेत. आवाज वाढवून ऐका, आमच्यापैकी कुठल्याही व्यक्तीपर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्हाला आमच्या सर्वांचा सामना करावा लागेल.
डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया
दरम्यान, ममदानी यांनी विजयी भाषणात ट्रम्प यांचा उल्लेख केल्यानंतर ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली आहे यात त्यांनी म्हटलं आहे की “..आणि हे आता सुरू झालं आहे.”
ममदानींच्या भाषणात पंडित नेहरूंचा उल्लेख
भारतीय वंशाचे नेते जोहरान ममदानी यांनी त्यांच्या भाषणात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं ऐतिहासिक भाषण ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’चा उल्लेख केला. ते म्हणाले, “इतिहासात असे क्षण क्वचितच येतात जेव्हा आपण जुन्या गोष्टी मागे टाकून नव्याकडे पाऊल टाकतो. एक युग संपतं आणि दीर्घकाळ दडपलेल्या राष्ट्राच्या आत्म्याला नवी अभिव्यक्ती प्राप्त होते.”
“आता आपण सिटी हॉलमध्ये दाखल झालो आहोत”
ममदानी अलीकडेच न्यूयॉर्कमधील टॅक्सीचालकांबरोबर बेमुदत उपोषणाला बसले होते. त्यावेळी त्या आंदोलनात सहभागी झालेले टॅक्सीचालक रिचर्ड यांचा उल्लेख करत ममदानी म्हणाले, “भावा आता आपण सिटी हॉलमध्ये प्रवेश केला आहे.”
