देशात स्वदेशी बनावटीच्या तिसऱ्या करोना लसीला मान्यता मिळाली आहे. सरकारी तज्ञ्जांच्या समितीने झायडस कॅडिलाच्या तीन डोस असलेल्या ‘जॉयकोव्ह-डी’ लसीला परवानगी देण्याची शिफारस केली होती. त्यानंतर लसीला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय औषध नियंत्रण मंडळाच्या समितीने जॉयकोव्ह-डीला मंजुरी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या लसीला मंजुरी मिळाल्याने ही भारतात वापरली जाणारी सहावी लस आहे. आतापर्यंत सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन जॉन्सनच्या सिंगल डोस असलेल्या लसीला परवानगी दिली आहे.

कंपनीने भारतात १२-१८ वयोगटातील मुलांसाठी सर्वात मोठी क्लिनीकल चाचणी घेतली आहे. ५० पेक्षा जास्त केंद्रांवर या लसीची चाचणी घेण्यात आली होती. भारतीय कंपनीने तयार केलेली जगातील पहिली डीएनए लस आहे, असा दावा जॉयडसने केला आहे.जॉयकोव्ह-डी ही जगातील पहिली डीएनए आधारीत लस आहे. तसेच या लसीचे तीन डोस देणं आवश्यक आहे. अहमदाबादमधील फार्मास्युटिकल कंपनी असेल्या झायडस कॅडिलाने १ जुलै रोजी जॉयकोव्ह-डी लसीच्या आपत्कालीन वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे मंजुरी मागितली होती. ही इंट्राडर्मल लस असून सुई न वापरता ट्रॉपिस वापरून दिली जाते. यामुळे लस टोचल्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतील.

देशात गेल्या २४ तासांत ३६ हजार ५७१ करोनाबाधित आढळले असून ५४० जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांसह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख ६३ हजार ६०५ वर पोहोचली आहे. ही रुग्णसंख्या गेल्या १५० दिवसांतील सर्वात कमी आहे. तर गेल्या २४ तासांत ३६ हजार ५५५ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३ कोटी १५ लाख ६१ हजार ६३५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशाचा रिकव्हरी रेट ९७.५४ टक्क्यांवर आहे. देशात करोनामुळे आतापर्यंत ४ लाख ३३ हजार ५८९ रुग्ण दगावले आहेत. सध्या विकली पॉझिटीव्हीटी रेट १.९३ टक्क्यांवर आहे. हा दर गेल्या ५६ दिवसांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर, डेली पॉझिटीव्हीटी रेट १.९४ टक्के असून हा दर गेल्या २५ दिवसांपासून सलग ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.