दररोज सकाळी उठल्यावर प्यायला जाणारा चहा असो किंवा चांगले काम करण्यासाठी बाहेर पडताना हातावर ठेवले जाणारे दही असू दे. त्यामध्ये साखर ही हवीच! इतक्या वर्षांपासून खात आलेली ही साखर नेमकी आली कुठून, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? किंवा आपण मराठीत या गोड पांढऱ्या गोष्टीला साखर म्हणतो. हिंदी भाषेत चिनी आणि इंग्रजीत शुगर मग ही नावे या एकाच पदार्थाला कशी पडली असतील, असा विचार मनात आला आहे का?

जर तुम्हीही खवय्ये असाल आणि पदार्थांचा इतिहास माहीत करून घ्यायची तुम्हाला आवड असेल, तर साखरेचा इतिहास आणि तिचा हा ‘प्रवास’ तुम्हाला नक्कीच आवडेल. दररोज खाल्ल्या जाणाऱ्या या गोड चव असलेल्या इतर पदार्थांची गोडी वाढविणाऱ्या साखरेचा आणि त्याच्या नावाबद्दलचा अतिशय रंजक असा इतिहास इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील enthucutletmag नावाच्या अकाउंटद्वारे शेअर केला गेला आहे, तो पाहू या.

हेही वाचा : आमटी, कालवण अन् रस्सा; कोल्हापुरातील प्रसिद्ध ‘पांढऱ्या रश्श्याचा’ जाणून घ्या रंजक किस्सा…

साखरेला ‘साखर आणि शुगर’ हे शब्द कुठून मिळाले?

ऊस उत्पादन हे सर्वप्रथम भारतातच सुरू झाले, असे समजले जाते. आणि आपल्याला माहीतच आहे की, उसाचा वापर करून गूळ आणि साखर बनवली जाते. तर उसाच्या रसापासून अनेक वर्षांपूवी अनरिफाईंड (प्रक्रियारहित) आणि भरभरीत साखर बनवली जायची. तिला संस्कृतमध्ये ‘शर्करा’ असे म्हटले जात असे. पुढे पर्शियन व्यापाऱ्यांनी या साखरेचे नाव ‘शक्कर’ असे केले आणि हा पदार्थ अरबी लोकांपर्यंत पोहोचवला. तिथे अरबी लोकांनी याचे ‘सक्कर’ किंवा ‘असक्कर’ असे नाव त्यांच्या भाषेनुसार ठेवले.

नंतर या ‘सक्कर’ने मेडिटेरियन भागात प्रवास केला आणि तिथे त्याचे लॅटिन नाव झाले साखरून [saccharo] आणि स्पॅनिशमध्ये झाले अझुकार [azúcar]. बापरे केवढा हा प्रवास! पण हा प्रवास इथेच थांबला नाही, तर पुढे फ्रेंच लोकांनी या लॅटिन शब्दाचे रूपांतर ‘सुख’ [sucre] असे केले आणि तिथून आपल्याला साखरेचा इंग्लिश शब्द ‘शुगर’ हा मिळाला. संस्कृतच्या शर्करा या शब्दाला जगात जसे विविध नावांनी ओळखले जाते, तसे आपल्या देशातही याचे अपभ्रंश पाहायला मिळतात. जसे की शर्कराला महाराष्ट्रात साखर, कन्नडमध्ये सक्करे आणि तमीळमध्ये सक्कराए.

हेही वाचा : जगातल्या सर्वात मोठ्या फुलाला येतो ‘सडक्या मांसाचा’ वास! काय आहे याचे नाव, जाणून घ्या

मग साखरेला ‘चिनी’ का म्हटले जाते?

साधारण सातव्या शतकात चायनानेदेखील साखरेवर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये त्यांनी साखरेवर प्रक्रिया करून, तिला पांढऱ्या रंगाच्या ‘रिफाईंड साखरेत’ रूपांतरित केले. अशी ही बारीक आणि चिनी मातीसारखी दिसणारी साखर साधारण १८ व्या शतकात ‘टॉम अचीव’ नावाच्या इसमाने पुन्हा भारतात आणली. याच टॉम अचीवने भारतातील सर्वांत पहिला साखर कारखाना कोलकातामध्ये सुरू केला होता. चीनमधून आलेल्या आणि एकंदरीत माती किंवा वाळूसदृश रूपामुळे त्या पांढऱ्या साखरेला ‘चिनी’ म्हणण्यास सुरुवात झाली.

View this post on Instagram

A post shared by Pranav Joshi (@floydiancookery)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा पद्धतीने आपल्याला मूळच्या ‘शर्करा’साठी साखर, चिनी व शुगर ही बहुप्रचलित नावे मिळाली असल्याची अत्यंत रंजक माहिती इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @enthucutletmag नावाच्या अकाउंटवरून मिळते. अन्नपदार्थांच्या नावांचा इतिहास सांगणाऱ्या या व्हिडीओला आतापर्यंत १.६ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.